शाळा
'कुसुमाग्रज' म्हणजे निर्विवाद भाषाप्रभु ! त्यांच्या ओजस्वी लेखणीतून कित्येक कविता लिहिल्या गेल्या. अवीट गीते रचली गेली. तशीच आमच्या शाळेची प्रार्थना पण त्यांनीच लिहिली होती. आमची प्राथमिक शाळा महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या शाळांपैकी एक होती. आजही शाळेचे ते विस्तीर्ण पटांगण आठवते. त्या प्रार्थनेला चाल कोणी दिली होती माहीत नाही पण खूप सुमधुर संगीत होत. एकेक कडव 'शाळा' आणि 'शिक्षणा'प्रति भक्तिभाव जागृत करेल असं होतं. शाळेच्या पटांगणात सर्व विद्यार्थ्यांच्या रांगा एकासुरात हात जोडून प्रार्थना म्हणायचा हे खुप सुंदर दृश्य होत. आज शाळेची ती जुनी वास्तू जमीनदोस्त झाली आहे. शाळा नवीन जागी स्थलांतरित झाली आहे. प्रार्थना अद्याप तीच आहे की नाही माहीत नाही. डॉन बॉस्को, झेव्हीयर, न्यू एरा, फ्रावशी अशा नावांच्या गदारोळात ती प्रार्थना कुठेतरी हरवून गेली आहे. 'शाळेच स्टेट्स' डाऊन होऊ नये म्हणून पालकांकडे 4 व्हीलर असेल तरच प्रवेश द्यायचा, असे निकष असलेल्या काही नवीन शाळा निघाल्या आहेत. मराठी माध्यमाच्या शाळा नाही म्हटलं तरी अखेरचा श्वास घेत आहेत. काही कॉन्व्हेंट शाळा मुल...