किशोरदाची जीवनगाणी

सॉक्रेटिस, एरिस्टॉटल पासुन कार्ल मार्क्स, विवेकानंदांपर्यत ह्या जगात अनेक तत्ववेत्ते होऊन गेले. 'जिवन/जिंदगी/जीना...' याविषयांवर त्यांनी बरेच तत्वज्ञान जगाला ऐकवलं जे आजही शाळा,कॉलेजेसच्या भिंतीपासून फेसबुक वॉलपर्यंत वाचायला भेटते. पण ह्या साऱ्यांच्या पलिकडे असलेला एक गडी फार वेगळा होता, ज्याने आयुष्याचे सर्व धागे उलगडून दाखवले. 'शब्द' जरी त्याचे नव्हते तरी त्याच्या आवाजाने ती जीवनगाणी अजरामर होत गेली. तो अवलिया होता अर्थातच 'किशोरदा'!! एक गायक म्हणून त्याची कारकिर्द उशिरा सुरू झाली, पण तो जेवढं गायला ते पिढ्यानपिढ्या पुरून उरेल एवढं अनमोल संचित आहे. एका ठिकाणी तो गातो, ‘जिंदगीका सफर, है यह कैसा सफर कोई समझा नही” तर दुसरीकडे तोच स्वतःला समजावतो की “जिंदगीके सफरमे गुजर जाते है जो मुकाम, वो फिर नही आते!!!’ “एक रास्ता है जिंदगी, जो थम गए तो कुछ नही” म्हणत तो ‘मुसाफिर हू यारो, न घर है ना ठिकाना’ हा राग आळवतो. तर दुसरीकडे “जिंदगी एक सफर है सुहाना” म्हणत हसत हसत जगायचा संदेश देतो. कधी आपल्या प्रेयसीला म्हणतो,”तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नही”, तर तिलाच पुन्हा म्हणतो की “जीवनसे भरी तेरी आंखे मजबुर करे जिनेके लिए”, कधी तिला म्हणतो,”जीनेकीं तुमसे वजह मिल गयी है” तर तिच्यावाचून जगण्याचा पर्यायच नसल्याने “ओ साथीरे ! तेरे बिनाभी क्या जीना’ ही साद घालतो. “जिंदगी तो बेवफा है एक दिन ठुकराएगी’ म्हणत हताश होतो, तर ‘जिंदगीकी यही रीत है’ म्हणत पुन्हा उभा राहतो. “गिला मौतसे नही है मुझे जिंदगीने मारा” हे सांगणारा किशोर “जिंदगी आ रहा हू मै’ म्हणत निधड्या छातीने तिला सामोरा जातो. जगाला तो ऐकवतो “जीवनके दिन छोटे सही हमभी बडे दिलवाले” आणि सगळ्यांचा हात हातात घेऊन गातो ‘जिंदगी मिलके बिताएंगे हाल-ए-दिल गाके सुनाएगे” कारण त्याच्यासाठी “जिंदगी हसने गाने के लिए है पल दो पल’ अशी असते. त्याला जीवन ‘कोरा कागज’ राहिल्याची जाणीव होते, तेव्हा तो मनाचं सांत्वन करताना म्हणतो, “यह जीवन है, इस जीवनका यही है यही है रंग रूप” किशोरच्या गाण्यातून जाणवायचं की “देखा है जिंदगीको कुछ इतना करिबसे” म्हणून त्याने गायलेली जीवनगाणी मनाला खोल कुठेतरी भिडतात. आणि आपणही त्याच्यासोबत गुणगुणत राहतो “जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिलको गाना पडेगा” -सौरभ रत्नपारखी

Comments

Popular posts from this blog

मंगरुळ तें वॉशिंग्टन

तुघलक

ताजमहल