रामायण-महाभारत

कालचे 'रामायण आणि महाभारत' ह्यांचे एपिसोड म्हणजे आयुष्यभर ध्यानी ठेवावे असे, धडे होते. #महाभारत - हस्तिनापूरच्या विभाजनानंतर आपल्या वाटेला ओसाड, वैराण भूमी आली म्हणुन पांडवांनी खचून न जाता कृष्णाच्या मार्गदर्शनाखाली तिथे नविन शहर वसवले. कृष्णाने त्यांना समजावले की आता हिच तुमची 'कर्मभूमी' आहे. इंग्रजीत एक Quote आहे, 'There is a great value in disaster, we can start all over again' लाक्षागृह आग आणि हस्तिनापूरच्या फाळणीतुन पांडवांनी हाच बोध घेतला असावा. आता सगळं संपलं ही भावना जेव्हा आयुष्यात येते, तेव्हाच कदाचित आपल्या हातुन आणखी चांगलं किंवा भव्य घडण्याची शक्यता असते. हा आशावाद खुप महत्वाचा आहे. पंजाबी, सिंधी, पारशी हे समाज सातत्याने व्यापार उदिमात पुढे राहिले आहेत. वाळवंटी भागातले 'अरब व मारवाडी' देखिल व्यापारात दीर्घकाळ पुढे आहेत ह्याचे कारणही तेच आहे. स्वतःच्या मातृभूमीत येणारी सुखलोलुप जीवनशैली मनुष्याला निर्धास्त करत असते. Survival instinct नावाची त्याची भावना कमी करत असते, त्यामुळे स्वतःच्या चौकटीबाहेर गेल्यावर त्याला जगणे दुष्कर होऊन जाते. मराठी माणसात देखिल हाच दोष आहे. स्वतःच्या मातृभूमीपासुन दूर जाऊन जेव्हा प्रतिकूल परिस्थितीत लढावं लागलं तेव्हा अंगी शौर्य व क्षमता असूनही पानिपत झालं. इंद्रप्रस्थाची स्थापना केल्यावर कृष्णाने अर्जुनाला शांत बसुन न राहता इतर राज्यांशी मैत्रीचे संबंध जोडण्यास सांगितले कारण दुर्योधनाच्या अभिमानी स्वभावाला ठेच लागल्याने भविष्यात होणाऱ्या संघर्षाची ती पुर्वतयारी आवश्यक होती, त्यामुळे जल्लोष करत असताना भावी संकटाची जाण असू देणे किती गरजेचे असते हे दिसुन येते. स्वत:च्या सामर्थ्याचा अवास्तव आत्मविश्वास न बाळगता इतरांशी सलोख्याचे संबंध ठेवणे कसे गरजेचे असते हे कृष्णाने समर्पक सांगितले. #रामायण - युद्धभूमीवर निघालेल्या मेघनादला आपल्या मृत्यूची चाहूल लागलेली होती, तरी देखिल तो आवेशाने म्हणाला, की 'जर राम आपल्या पित्याच्या वचनासाठी इतकं काही करू शकतो तर मी त्याचा आदर्श अवश्य घेईन.' मेघनादच्या मृत्यूनंतर देखिल रामाने त्याचे कलेवर सन्मानपुर्वक लंकेला पाठवले होते. मतभेद किंवा मनभेद झालेले असले तरी आपल्या विरोधकांच्या चांगल्या गुणांचा आदर्श घेणे किंवा त्यांच्या मतांचा सन्मान करणे ही आजकालच्या सोशल मिडीयाच्या जगात दुर्लभ झालेली गोष्ट आहे. राम व मेघनाद दोघांनीही एकमेकांबद्दल आदरभाव बाळगला. रामाने 'मरणांती वैराणी' म्हणत मेघनादच्या मृत्यूनंतरही त्याला चांगली वागणूक दिली. अस म्हणतात की 'रामायण' मालिका प्रथम प्रदर्शित झाली, तेव्हा राजस्थानात एक सती प्रकरण गाजत होत, त्यामुळे मेघनाद सोबत सुलोचना सती जाण्याच्या प्रसंगाला अतिरंजित न करता रामानंद सागर ह्यांनी आटोपत घेतलं. आज काळवेळ पाहून हे माध्यमभान किती जण दाखवू शकतील?? रामायण - महाभारत हे समाजासाठी सार्वकालिक दीपस्तंभ आहे. -सौरभ रत्नपारखी

Comments

Popular posts from this blog

आजीबाईंचा सिनेमा

अदालत की कारवाई

धन्यवाद साहेब