कॅसेट एरा



९० च्या दशकाच्या मधली गोष्ट ! माझ्या मामांच कॅसेट्सच दुकान होत. तो काळ म्हणजे कॅसेटयुगाचा सुवर्णकाळ होता !!

विश्वात्मा, त्रिदेव, मोहरा, साजन, बाजीगर, अशा अनेक कॅसेट्स पार्लर,ऑटोरिक्षा, रसवंती, काळी-पिवळी...अशा कानाकोपऱ्यात वाजत असत. रिक्षावाले तर म्युजिक सिस्टिम आहे ह्या कारणास्तव जास्त भाडे घेई.

गुलशनकुमारने टी सिरीजच्या माध्यमातून आणलेल्या सोनू निगम, अनुराधा पौडवालच्या आवाजातल्या अनेक भक्तीगीतांच्या कॅसेट्स तडाखेबंद विकल्या जाई.

अल्ताफ राजाच्या 'तुम तो ठहरे परदेसी'च्या पिशव्या भरभरून कॅसेट्स मी मामांना वितरकाकडुन आणून दिल्याचे आजही आठवत. 

फक्त फिल्मी गाणीच नव्हे तर जॉनी लिव्हर, जॉनी रावत ह्यांच्या मिमिक्री, विनोदांच्या कॅसेट्स पण लोकप्रिय होत्या. 

कोळीगीतांच्या गाण्यांची एक वेगळी क्रेझ होती. वेसावची पारू किंवा टॉप टेन कोळीगीताच्या कॅसेट्स हातोहात विकल्या जाई. 

छगन चौघुलेंच्या आवाजातल्या चांगुणाची कथा, सती अनुसयाची कथा, चिलया बाळाची कथा.... अशा अनेक आख्यायिकांचा स्वतःचा एक श्रोतावर्ग होता. 

सिझनल खपणाऱ्या कॅसेट्स अनुभवातून कळू लागल्या होत्या. स्वातंत्र्यदिन जवळ आला की महेंद्र कपुरच्या देशभक्तीपर गीतांना मागणी येई. गणेशोत्सव जवळ आला की, मंगेशकर भगिनींच्या अष्टविनायक कॅसेट्सची विचारणा सुरू होई. 
आषाढी-कार्तिकीला प्रल्हाद शिंदेंच्या आवाजातील 'चल ग सखे पंढरीला' कॅसेट घ्यायला एखादा तरी नक्की येई. शिवजयंतीला "सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला मुक्कामी मालेवाडीला, शाहीर देशमुख गातो पोवाड्याला' हे गल्लीच्या मधोमध असलेल्या कॅसेटप्लेअरवर ऐकताना  महाराष्ट्राच्या कित्येक पिढ्या घडल्या असतील.
'निसर्गराजा', मेहंदीच्या पानावर मधली मराठी गायकांची गाणी म्हणजे एक अनमोल ठेवा वाटायचा. सुलभा देशपांडे, आश्विनी भावे, उषा नाडकर्णी ह्यांच्या आवाजातल्या 'छान छान गोष्टी' पण धमाल.

सुरेश वाडकरांचं 'ओंकार स्वरूपा', अजित कडकडेंच दत्ताची पालखी, रवींद्र साठेंच्या आवाजातील मनाचे श्लोक, अनुप जलोटांचं 'ऐसी लागी लगन', जगजीतसिंगाच 'हे राम', अशा अनेक कॅसेटसने तो काळ अक्षरशः गाजवला होता.

आपल्या आवडत्या निवडक गाण्यांची कॅसेट तयार करून घेणे हा एक मस्त प्रकार होता. 
कॅसेटच्या क्षमतेनुसार त्यात किती गाणी बसतील आणि कोणती गाणी भरायची ह्याचा हिशोब करण्यात एक वेगळी मजा होती. प्रत्येकाची आवडनिवड जपावी लागे.
एखाद्याच आवडत्या गाण्यासाठी 50 रुपये मोजण्यापेक्षा हा स्वस्त पर्याय तेव्हा होता. इंडिपॉपचे कित्येक अल्बम असे एकाच कॅसेटमध्ये भरले होते.

कधी कधी स्वतःच्या आवाजात गाणी रेकॉर्ड करण्याची हौस देखिल भागवली जाई. त्यात पार्श्वभूमीला कोणीतरी मध्येच बोलण्याचा आवाज जर आला तर एडिट करायची सोय नव्हती.

यावेळी दिवाळीत घर आवरताना अनेक कॅसेट्स फेकून दिल्या. वॉकमन, सीडी प्लेअर, पेन ड्राइव्ह, स्मार्टफोन असा प्रवास करताना त्यांची उपयुक्तता संपून गेली होती. 
आतमधील टेप बाहेर काढून पेन्सिलने गोल फिरवत परत जागेवर न्यायचं अस लहान मुलांच खेळण एवढंच त्याच मोल उरल होत.

शेवटची कॅसेट 'साथीया'ची घेतल्याचं आठवत. पण आता कॅसेट नावाचा साथीया कायमचा साथ सोडुन गेलाय एक युगांत करून..!!

सौरभ रत्नपारखी

#CinemaGully

Comments

Popular posts from this blog

आजीबाईंचा सिनेमा

अदालत की कारवाई

धन्यवाद साहेब