मंगरुळ तें वॉशिंग्टन

मंगरुळ तें वॉशिंग्टन

‘देऊळ’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटात एक धमाल पात्र आहे. मंगरुळ नावाच्या विकासापासून कोसो दूर असलेल्या एका खेडेगावात, एक महिला सरपंच (आतिशा नाईक) असते. पण तिच्या सरपंचपदाआडून गावातला मातब्बर असामी असलेला भाऊ (नाना पाटेकर) आणि त्यांचा पुतण्या (श्रीकांत यादव) यांच्यातलेच कुरघोडीचे राजकारण चालू असते.

तिच्या सासूच्या (उषा नाडकर्णी) लेखीसुद्धा तिच्या सरपंच असण्याची किंमत शून्य असते. एखाद्या अडचणीच्या वेळी सरपंच बाई कामाला निघाल्या, की सासूबाई ‘नुसतं फराफरा अन टराटरा’ म्हणत तिला उद्देशून टोमणे मारत असते. हे उद्योग करण्यापेक्षा कुठे वाळवणाला गेलीस तर चार पापड मिळतील, नुसती शायनिंग काय कामाची, हीच काय ती तिच्या सासूची माफक अपेक्षा! मंगरूळ गावच्या कथेचा हा ट्रॅक पुढे दत्त मंदिराच्या उभारणीकडे जातो. पण जाताना हसवता हसवता आपल्याला अंतर्मुख करून जातो, कारण गावपातळीवरचा हा राजकारणी महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन आपण स्वतः कुठे ना कुठेतरी अनुभवलेला असतोच. केवळ कथेतील मंगरूळच नव्हे तर जगाच्या पाठीवर याविषयी काय वेगळे चित्र दिसत आहे?

आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडेन विजयी झाले आहे.आजवरच्या इतिहासात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची माळ एकाही महिलेच्या गळ्यात पडलेली नाही. गेल्या वेळेस हिलरी क्लिंटन यांच्या रूपाने इतिहास घडवण्याची चांगली संधी अमेरिकच्या जनतेला मिळाली होती. पण हिलरींना पराभूत व्हावे लागले. बराक ओबामांच्या रुपाने पहिला कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष देऊन अमेरिकन जनतेने एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच जगाला चांगला संदेश दिला होता. अमेरिकेचे जागतिक राजकारणातील स्थान लक्षात घेता वर्णभेदाविरुद्ध लढणाऱ्या सर्व योध्यांना बळ देणारी ती घटना होती. त्याचप्रमाणे हिलरींचा विजय झाला असता, तर लिंगभेदाविरुद्ध लढणाऱ्यांचेही मनोबल नक्कीच वाढले असते. पण तसे घडले नाही.

‘जागतिक राजकारणातील महिलांच स्थान’ हा खरंतर संशोधनाचा मुद्दा होऊ शकतो. क्वीन व्हिक्टोरियाचा वारसा चालवणाऱ्या क्वीन एलिझाबेथ यांच्यासारख्या महिलांचं जागतिक राजकारणात निश्चितच मोलाच स्थान आहे. पण वारशातून आलेलं नेतृत्व आणि स्वकर्तुत्वाने पुढे आलेलं महिला नेतृत्व यांची तुलना केली तर विरोधाभास दिसून येईल. मार्गारेट थॅचर, थेरेसा मे यांचे अपवाद वगळले तर जगातील सर्वात जुन्या लोकशाहीचे बिरुद मिळवणाऱ्या इंग्लंडमध्येदेखील आजवर सत्तेच्या केंद्रस्थानी महिला अभावानेच आल्या. प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत विकसनशील म्हणवल्या जाणाऱ्या देशांत मात्र याबाबतीत थोडी अधिग प्रगती झाली आहे. याघडीला जवळपास २१ देशात राष्ट्राध्यक्षा किंवा पंतप्रधान पदावर महिला आहेत. केवळ भारतीय उपखंडातील आपल्या आणि शेजारच्या दक्षिण आशियाई देशांचं उदाहरण घेतलं तरी स्वातंत्र्यानंतर इंदिरा गांधी, प्रतिभा पाटील (भारत), बेनझिर भुट्टो (पाकिस्तान),  शेख हसीना, खलिदा झिया (बांगलादेश), चंद्रिका कुमारतुंगा, सिरिमाओ बंदरनायके (श्रीलंका), औंग सान सु की (म्यानमार) अशा अनेक महिला राज्यकर्त्यांनी सत्तेच्या वर्तुळात उच्चपदे भूषविली आहेत.

भारतातल्या देशांतर्गत राजकारणाचा विचार केला तर आजवर सुश्री मायावती (उत्तरप्रदेश), ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल), वसुंधराराजे सिंधीया (राजस्थान), जयललिता (तामिळनाडू), आनंदीबेन पटेल (गुजरात), उमाभारती (मध्यप्रदेश), राबडीदेवी (बिहार) इत्यादी महिलांनी मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. तसेच सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित यांच्यापासून प्रभा राव, नजमा हेपतुल्लापर्यंत राज्यपाल पदावरसुद्धा महिलांनी स्वतःची छाप सोडली आहे. लोकसभेच अध्यक्षपददेखील घटनात्मकदृष्टीने महत्त्वाचे असते. त्याठिकाणीदेखील मीराकुमार, सुमित्रा महाजन यांनी कुशलरीत्या जबाबदारी सांभाळली आहे. सोनिया गांधी, प्रियंका गांधी, प्रियंका चतुर्वेदी, स्मृती मल्होत्रा, निर्मला सितारामन् यांनीदेखील भारतीय राजकारणात स्वतःचे स्थान कमावले आहे. सामाजिक प्रबोधनाची आणि सुधारणेची गौरवशाली परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रासारख्या राज्याला मात्र आजपावेतो महिला मुख्यमंत्री लाभलेली नाही. त्या तुलनेत बिमारु म्हणून उल्लेखल्या जाणाऱ्या राज्यात याबाबतीत चांगली प्रगती दिसून येत आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीत सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदे, पंकजा मुंडे, नवनीत राणा, पूनम महाजन अशा अनेक महिला राजकारण्यांनी स्वतःच स्थान निर्माण केलं आहे. पण यापैकी जवळपास सर्व महिलांना घरातूनच राजकारणाचा वारसा लाभला आहे. जनसंघटन वाढवून, निवडणुकीच्या माध्यमातून पुढे आलेल्या महिला राजकारणी अभावाने दिसून येत आहे.

पण केवळ निवडून येता येण्याची क्षमता अथवा वारसा हाच महिलांच्या यशाचा मापदंड म्हणणेही योग्य होणार नाही. ज्या इंदिरा गांधींचा उल्लेख ‘गुंगी गुडीया’ म्हणून केला गेला होता, त्यांनीच १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात कणखरपणे देशाचे नेतृत्व केले. तेव्हा या गुडीयाने धारण केलेला दुर्गावतार साऱ्या जगाने पाहिला होता. इस्राएलच्या गोल्डा मेयर ह्यांनी म्युनिक हत्याकांडानंतरची परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली त्याचे उदाहरण आजही दिले जाते. फार दूरवर कशाला न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी असलेल्या जेसिंडा ऑर्डर्न यांनी ज्यापद्धतीने कोरोना संसर्ग काळात देशाचे नेतृत्व केले त्यासाठी जगभर त्यांच्या कार्यकुशलतेचे कौतुक केले जात आहे.

जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी...हे वाक्य देशाची सूत्रे सांभाळणाऱ्या अनेक महिलांनी सार्थ ठरवलं आहे. तरीही यातील महिलांचा सहभाग वाढणं गरजेचं आहे. केवळ घराचा राजकीय वारसा सांभाळायचा म्हणून पदावर शोभेची किंवा कळसूत्री बाहुली न बनता जेव्हा महिला हिरीरीने राजकारणात उतरतील, तेव्हा नक्कीच समाजात एक आश्वासक बदल घडेल यात शंका नाही.

- सौरभ रत्नपारखी

Comments

Popular posts from this blog

आजीबाईंचा सिनेमा

अदालत की कारवाई

धन्यवाद साहेब