शाळा

'कुसुमाग्रज' म्हणजे निर्विवाद भाषाप्रभु ! त्यांच्या ओजस्वी लेखणीतून कित्येक कविता लिहिल्या गेल्या. अवीट गीते रचली गेली. तशीच आमच्या शाळेची प्रार्थना पण त्यांनीच लिहिली होती. आमची प्राथमिक शाळा महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या शाळांपैकी एक होती. आजही शाळेचे ते विस्तीर्ण पटांगण आठवते. त्या प्रार्थनेला चाल कोणी दिली होती माहीत नाही पण खूप सुमधुर संगीत होत. एकेक कडव 'शाळा' आणि 'शिक्षणा'प्रति भक्तिभाव जागृत करेल असं होतं. शाळेच्या पटांगणात सर्व विद्यार्थ्यांच्या रांगा एकासुरात हात जोडून प्रार्थना म्हणायचा हे खुप सुंदर दृश्य होत. आज शाळेची ती जुनी वास्तू जमीनदोस्त झाली आहे. शाळा नवीन जागी स्थलांतरित झाली आहे. प्रार्थना अद्याप तीच आहे की नाही माहीत नाही. डॉन बॉस्को, झेव्हीयर, न्यू एरा, फ्रावशी अशा नावांच्या गदारोळात ती प्रार्थना कुठेतरी हरवून गेली आहे. 'शाळेच स्टेट्स' डाऊन होऊ नये म्हणून पालकांकडे 4 व्हीलर असेल तरच प्रवेश द्यायचा, असे निकष असलेल्या काही नवीन शाळा निघाल्या आहेत. मराठी माध्यमाच्या शाळा नाही म्हटलं तरी अखेरचा श्वास घेत आहेत. काही कॉन्व्हेंट शाळा मुलींनी टिकली, मेहंदी लावून आल्याने दंड करत असल्याच्या बातम्या वाचल्या आहेत. पाटीवर सरस्वतीपूजन करणे काहींना सनातनीपणा किंवा शिक्षणाचे भगवेकरणं वाटते. पुस्तकात महाभारताचे धडे असणे म्हणजे मुलांना लहानवयात हिंसेचे व प्रतिशोधाचे संस्कार देणे असं काहींना वाटत. आमच्या शाळेने आम्हाला कोणत्याही धर्माचा विद्वेष करायला शिकवलं नाही. असं काही असेल ह्याची जाणीवही तेव्हा झाली नव्हती. पण जग खूप बदललय. आज कुसुमाग्रजही नाही आणि ती शाळाही नाही. पण 'विद्यालय' शब्दामागे असलेले नैतिकतेच अधिष्ठान सांगणारे ते प्रार्थनेचे शब्द अद्याप पाठ आहेत. "महंमंगले ज्ञानदेवते प्रणाम तुझ माउली... युगायुगांची प्रकाशगंगा उदे तुझ्या पाउली . स्पर्श तुझा तिमिरात पेटवी नक्षत्रांचे दिवे मरुभूमीवर तूच फुलविसी सुमनांचे ताटवे धरतीच्या मातीस स्वर्गता तुझ्यामुळे लाभली ! युगायुगांची प्रकाशगंगा उदे तुझ्या पाउली ! तेजोमय तू ! करुणामय तू ! वत्सल गगनापरी भेदभाव नां तुझ्या कृपेचा कर सर्वांच्या शिरी तूच प्रेरणा पराक्रमाची, समतेची साउली ! युगायुगांची प्रकाश गंगा उदे तुझ्या पाउली ! हे विद्यालय ! तव देवालय, पावन ह्या प्रांगणी साधक आम्ही तूच आमुच्या भाग्याची स्वामिनी जागव जननी नित ईश्वरता अमुच्या हृदयातली ! युगायुगांची प्रकाशगंगा उदे तुझ्या पाउली ! कुसुमाग्रज ©सौरभ रत्नपारखी

Comments

Popular posts from this blog

मंगरुळ तें वॉशिंग्टन

तुघलक

ताजमहल