ए.आर.रहमान
आज वयाची पस्तिशी ओलांडणाऱ्या आणि रूढार्थाने तरुणाईचे दिवस मागे पडत चाललेल्या माझ्या पिढीवर तीन लोकांचा मोठा प्रभाव आजवर राहिला आहे.
पहिला म्हणजे शिवाजी पार्कच्या गल्लीबोळात क्रिकेट खेळता खेळता जागतिक दर्जाचा खेळाडू झालेला एक मराठीच्या प्राध्यापकाचा मुलगा,
दुसरा म्हणजे दिल्लीहून मुंबईला सिनेमात नशिब आजमावायला आलेला एक होतकरू अभिनेता ज्याला अभिनयाची कोणतीच पार्श्वभूमी नव्हती,
आणि तिसरा म्हणजे शाळा शिकायच्या वयात लहानपणी डोक्यावरून वाद्ये भाड्याने देण्यासाठी वाहुन नेणारा एक मद्रासी तरुण !!
होय ! सचिन, शाहरुख, रहमान ह्या तिघांनी आम्हा 90's kids वर स्वतःची एक अमिट छाप सोडली आहे. ह्या तिघांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कारकिर्दीचे शिखर गाठले तेव्हा तिघांचे वडिल ते पाहण्यास हयात नव्हते.( सचिनच्या वडिलांनी त्याला वर्ल्डकप उचलताना बघायला हव होत अस नेहमी वाटत.)
ए.आर.रहमान...!
'मेरी जंग' सिनेमातल्या अनिल कपुरची वाटावी अशी ह्याच्या आयुष्याची चित्तरकथा !
मंदिरात भजन-प्रवचन करणाऱ्याचा नातू आणि गळक्या छपराच्या छोट्या घरात राहणाऱ्या वायरमनचा हा मुलगा, मूळ नाव दिलीप !! एवढीच त्याची ओळख राहिली असती पण नियतीने त्याच्यापुढे वेगळं वाढून ठेवलं होतं.
रहमानच्या वडिलांना घरातील परंपरागत व्यवसाय मान्य नव्हता म्हणून म्युजिक अरेंजर/ संगीत दिग्दर्शक बनण्याच स्वप्न उराशी बाळगत त्यांनी वाटचाल सुरू केली होती. नाटक कंपन्या आणि सिने-निर्मात्यांचे दरवाजे ठोठावल्यानंतर अखेर संधी मिळणे सुरू झाले. घरात सुबत्ता येऊ लागली, म्युजिक अरेंजर म्हणून त्यांनी चांगला नावलौकिक मिळवला पण अचानक नशिबाने पलटी मारली. रहमानच्या वडिलांना कॅन्सरने हिरावून नेले. योगायोग बघा ते वारले तेव्हा त्यांनी संगीत दिलेला पहिला सिनेमा प्रदर्शित झाला होता.
त्या आजारपणाने सर्वस्व गमवावे लागले.
आईला व्यावहारिक जगाचा गंध नव्हता म्हणुन गाठीशी पैसे कमी शिल्लक राहिले.
वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी पाठच्या तीन बहिणी आणि आई ह्यांची जबाबदारी दिलीपच्या पाठीवर आली.
देवाची इतकी भक्ती, प्रवचन, भजन करूनही पदरी नैराश्य आल्याने दिलीपच्या आईने धर्म बदलला त्यामुळे त्याला नविन ओळख मिळाली.... ए.आर. अर्थात 'अल्ला रखा रहमान !!'
वडिलांनी घरी जमवलेली वाद्यवृंद भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला होता. ह्याने तीच आपल्या डोक्यावरून वाहून नेत संगीत दिग्दर्शकांकडे पोहोचवायला सुरुवात केली.
सुरांशी परिचय होताच, वडिलांच्या मित्रांच्या ओळखीतून हळूहळू मैफिलीमध्ये कीबोर्ड वाजवायची संधी मिळू लागली, या सर्वात शाळेकडे दुर्लक्ष्य होत होतं. शाळेतल्या शिक्षिकेनी दम देखील दिला की, शिक्षणात खंड पडला तर रस्त्यावर वाद्य वाजवून पैसे कमवावे लागेल.
पण कुटूंबाच्या उदरनिर्वाहाकरिता दुसरा पर्याय नव्हता, तो घरात एकटा कर्ता पुरुष उरला होता. अखेर एका वळणावर शाळा सोडुन द्यावी लागली. कॉम्प्युटर इंजिनिअर बनण्याच स्वप्न, स्वप्नच राहिल.
अखेर स्वतःहून शिकू पाहणाऱ्या ह्या एकलव्याला द्रोणाचार्य मिळाला 'इलाया राजा' ह्या महान संगीतकाराच्या रूपाने !!
पण ह्या द्रोणाचार्यांने त्याचा अंगठा मागितला नाही, तर त्याच्या बोटांची जादू ओळखून आपल्या संचात कीबोर्ड प्लेअर म्हणून घेतले.
हळूहळू कीर्ती पसरत गेली. मैफिली, जाहिरातींच्या जिंगल्स करता करता मनिरत्नम नावाच्या रत्नपारख्याने हा हिरा अचूक पारखला आणि त्याला ' रोजा'चे संगीत द्यायला निवडले.
रोजाच्या सुरावटी ऐकून तर सर्व देशच रोमांचित झाला. केवळ संगीताच्या जोरावर 'ये हसी वादिया' म्हणत हिमवर्षावाची अनुभूती देणारा कोण हा किमयागार?
मग प्रवास सुरु झाला. रोजा, बॉम्बे, दिल से, रंगीला, दौड, साथीया, इंडियन, जोधा अकबर, लगान, स्वदेस, रंग दे बसंती,......!!!
किती नावे घ्यावी.??
हैतीच्या भूकंपग्रस्ताना मदतनिधी गोळा करण्यापासून व्हाइट हाऊसच्या हिरवळीवरील मेजवानीपर्यत सर्वत्र ए.आर.रहमान हे नाव गेले तीन दशके निनादत आहे.
ऑस्कर, ग्रॅमी,नॅशनल अवॉर्ड, फिल्मफेअर अशी पुरस्कारांची रास घरात उभी राहिली.
'लॉर्ड ऑफ दि रिंग असो किंवा एव्हेंजर्स..'सर्व जगाला रहमॅनिया झाला आहे.
तो स्वभावाने तसा अबोल, सचिन जसा बॅटिने बोलायचा तसा हा संगीताने बोलत गेला. लंडन ऑलिम्पिक असो अथवा कॉमनवेल्थ त्याच्या संगीताने देश, प्रांत, धर्माची सर्व बंधने तोडली.
त्याचा स्वतःचा धर्म बदलला तरी संगीत हाच त्याचा धर्म बनला म्हणूनच 'ओ पालनहारे' असो किंवा 'ख्वाजा मेरे ख्वाजा' त्याचे सूर दोन्ही धर्माशी एकनिष्ठ वाटतात.!
'माँ तुझे सलाम' म्हणताना त्याने कट्टरपंथीयांच्या धमक्यांना सुद्धा जुमानले नाही.
त्याने दिलेले संगीत हे एका सर्वसामान्य भारतीयाच्या भावविश्वातून आलेले होते, म्हणूनच ऑस्कर घेताना तो आपसूक म्हणून गेला की 'मेरे पास माँ है'!! कारण वयाच्या नवव्या वर्षी अंगावर आलेल्या जबाबदारीने आणि परिस्थितीचे चटके भोगलेल्या त्याच्या आईने अनुभवलेली दुनियादारी आजही त्याच्या संगीतातूनही दिसते. ऑस्कर स्वीकारताना तो हेही म्हणाला की 'मला प्रेम आणि द्वेष यापैकी एक निवडायच होत, मी प्रेम निवडल'!!!!! त्याच ते मनोगत अप्रासंगीक होत, पण तो ज्या शिखरावर पोहोचला होता तिथे ते अभावीतपणे त्याच्या ओठी येणारच होते. (इतनी शिद्दतसे मैने तुम्हे पानेकी कोशिशकी है, म्हणावं तस)
आज ए.आर.रहमानच कोणतंही गाणं लागलं की त्याचा जीवनपट डोळ्यासमोर येतो, गुलजारने लिहिलेलं 'जय हो' गाणं त्याच्या वाटेला यावं हाही नियतीचा योगायोग !!
'रत्ती रत्ती सच्ची मैने जान गवाई है,
नच नच कोयलोपे रात बिताई है,
अखियोकी निंद मैने फुकोसे उडादि,
गिन गिन तारे मैने उंगली जलाई है'
आज त्याच संगीत ऐकून जग 'जय हो' म्हणत असेल तर तो deserving आहे.
सौरभ रत्नपारखी
#CinemaGully
Comments