ताजमहल
हिंदी सिनेमात दोन कलावंतांतील मतभेद, वाद-विवाद, शत्रुत्व ही नविन गोष्ट नाही.
कधी 'व्ही.शांताराम-दादा कोंडके', कधी 'कुमार सानु-उदित नारायण,' कधी 'सलमान खान-विवेक ओबेरॉय'.... !! ह्यांच्या कथा मसाला लावुन सांगितल्या जातात.
पण दोन गीतकारांमधील वैचारिक मतभेद त्यांच्या कलेतून कसे व्यक्त होतात ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे 'साहिर लुधियानवी' आणि 'शकील बदायुनी' ह्यांच्यातील ताजमहालावरील 'war of words'!!
शकील बदायुनींचा जन्म उत्तरप्रदेशच्या एका धार्मिक कुटुंबात झाला होता. शायर म्हणून तिथे त्यांनी चांगला नावलौकिक मिळवला होता. अलिगढ विद्यापीठात शिकत असतानाच उत्कृष्ट शायर म्हणुन त्यांनी प्रसिद्ध झाले होते.
मुंबईत आल्यानंतर मुघल-ए-आझम, बैजु बावरा, दिदार, गंगा जमुना सारख्या सिनेमातून त्यांनी अनेक अजरामर गीते सिनेविश्वाला दिली. चौदहवी का चांद हो, हुस्नवाले तेरा जवाब नही, कही दीप जले...!! ह्या गीतांसाठी फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाले.
दुसरीकडे साहिर लुधियानवी हे पंजाबच्या लुधियानाचे, मूळ नाव अब्दुल हायी..!! फाळणीनंतर ते भारतात स्थायिक झाले. वैयक्तिक आयुष्यात आलेले कटू अनुभव त्यांच्या लेखणीतूनही दिसत राहिले. नौजवान, प्यासा, बाजी, कभी कभी अशा अनेक चित्रपटातुन त्यांनी लिहिलेली गीते लोकप्रिय झाली.
औरतने जन्म दिया मर्दोको, जो वादा किया वो निभाना पडेगा, कभी कभी मेरे दिलमे या गीतांसाठी त्यांना फिल्मफेअरने सन्मानित करण्यात आले होते !!
ह्या दोन्ही गीतकारांचा पिंड वेगळा होता.
शकील हे पारंपरिक विचारांच्या कुटुंबातुन आलेले, त्यामुळे मध्यमवर्गीय घरातील स्वप्नाळू आशावाद, रोमँटिझम त्यांच्या गीतातून दिसत असे तर साहिर हे कम्युनिस्ट विचारांचे होते. प्रस्थापित विचार व संस्कृतीच्या विरोधात पुरोगामी विद्रोही भुमिका घेण्यासाठी ते प्रसिद्ध होते.
या दोन्ही समकालीन गीतकारांच्या मतभेदाचे पडसाद त्याकाळातील गीतात दिसत असत.
'ताजमहाल' हे त्याचे उदाहरण होते.
शकीलने गीत लिहिले होते,
"एक शहनशाहने बनवाके हसी ताजमहल
सारी दुनियाको मोहोब्बतकी निशाणी दि है
इसके साये मे सदा प्यारके चर्चे होंगे
खत्म जो हो ना सकेगी वो कहानी दि है"
तर साहिरच म्हणणं होतं,
"ताज तेरे लिए एक मझार-ए-उल्फत सही,
तुझको इस वादी ए रंगीनसे अकिदतही सही,
मेरे मेहबूब कही और मिलाकर मुझे"
शकील 'मेरे मेहबूब' या गाजलेल्या गीतात म्हणतो,
"तेरे साये को समझकर मै हसी ताजमहल
चांदणी रातमे नजरोसे तुझे प्यार करू"
तर ताजमहालच्या बांधकामानंतर कारागिरांचे हात छाटण्यात आले होते अशी दंतकथा असल्याने साहिरमधला कम्युनिस्ट म्हणतो,
"ये चमनझार ये जमुनाका किनारा ये महल,
ये मुनक्कश दर-ओ-दिवार,ये महराब ये ताक,
इक शहनशाहने दौलतका सहारा लेकरं,
हम गरिबोके मोहब्बतका उडाया है मजाक'
जगातील सात आश्चर्यापैकी एक असलेल्या ताजबद्दल अशा दोन टोकांच्या विचारधारा बॉलीवुडमध्ये दिसून येतात. पण खरंतर हेच आपल्या साहित्यिकांच्या प्रतिभेच वैशिष्ट्य म्हणता येईल.
सौरभ रत्नपारखी
#CinemaGully


Comments