इतिहास सिनेमॅटिक लिबर्टीचा (पौराणिक सिनेमा)

भाग 1 .. पौराणिक सिनेमा भारतीय जनमानसाला 'सिनेमा' आणि 'क्रिकेट'ह्या दोन गोष्टींचे प्रचंड वेड आहे. त्यातच सिनेमातल्या फॅशन, संवाद, प्रसंग ह्यांचा दैनंदिन जीवनावर खूप परिणाम दिसून येतो, त्यामुळे इतिहासाच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या समाजात सिनेमॅटिक लिबर्टी हि चित्रपट निर्मात्यासाठी एक कसरतच असते. संजय लीला भन्साळी ह्यांच्या बहुचर्चित 'पद्मावती' सिनेमाच्या निमित्ताने हे नुकतंच दिसून आले. त्यानिमित्ताने 'ऐतिहासिक चित्रपट' आणि 'वास्तव' ह्यांचा वेध घेण्याचा एक प्रयत्न ह्या छोटेखानी लेखमालिकेतून करत आहे. आवडेल अशी आशा बाळगतो. 3 मे 1913 रोजी 'राजा हरिश्चंद्र'च्या रूपाने भारतीय सिनेमाची सुरुवात झाली. त्याकाळी भारतात हा व्यवसाय नवाच होता त्यामुळे या चित्रपटातील कलावंत कुठे काम करायचे ह्यांचं उत्तर देताना 'हरीश्चंद्राच्या फॅक्टरी'त असे उत्तर द्यायचे.(तेव्हापासून सुरु झालेला हा प्रवास आज 'रामगोपाल वर्माकी फॅक्टरी'पर्यत आला आहे.😀). दादासाहेब फाळके ह्यांनी येशु ख्रिस्ताच्या जीवनावर आधारित एक सिनेमा पाहिला होता, तो सिनेमा पाहिल्यानंतर भारतीय देवतांच्या कथासुद्धा अशाच पडद्यावर झळकल्या पाहिजे ह्या ध्यासाने त्यांना पछाडले व त्यांनी ते स्वप्न वास्तवात आणले.
राजा हरिश्चंद्राची कथा भारतीय जनमानसाला भावणारी होती. हा सिनेमा ज्याकाळात बनविण्यात आला त्याकाळी राजा रविवर्मा ह्यांनी रेखाटलेली भारतीय देवी-देवतांची तैलचित्रे लोकप्रिय झाली होती. आजही खेड्यापाड्यातील जुन्या घरात तशी चित्रे आढळून येतात. दादासाहेबांनी ह्याच रूढ झालेल्या प्रतिमा चित्रपटाच्या माध्यमातुन लोकप्रिय केल्या. राजा रविवर्मा (मूळ दक्षिण भारतीय असूनही) ह्यांच्यावर मराठी संस्कृतीचा खूप पगडा होता. त्यांनी चित्रे रेखाटताना मॉडेल्स स्वरूपात महाराष्ट्रीय वेशभूषाच डोळ्यासमोर ठेवल्याने त्याचे प्रतिबिंब त्यांच्या चित्रात दिसून आले. त्यामुळे दादासाहेबांच्या हरिश्चंद्र व तारामतीसह इतर सर्व पात्र हे पडद्यावर मराठी वेशभूषेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मूळ कथेतले उत्तर भारतीय राजा-राणी हे अस्सल मराठमोळे वाटतात. पुढच्या काळात इतर सर्व चित्रपट व टिव्ही मालिकांनी ह्याच गोष्टीचा कित्ता गिरविल्याने कथेच्या दृष्टीने विसंगत असले तरी पडद्यावर मराठमोळे देवी देवता दिसू लागले. परेश मोकाशी दिग्दर्शित 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' ह्या सिनेमात देखील एक गंमतीदार प्रसंग आहे. दादासाहेबांचा कॅमेरामनं मित्र एका प्रसंगाच्या चित्रीकरणात त्याना विचारतो कि 'ह्या दृश्यात मागे फणस दिसत आहेत त्या काळात फणस होते का?' त्यावर दादासाहेब म्हणतात 'ते महत्वाचं नाही, कथा महत्वाची'!!' भारतीय सिनेमाचं ते पहिलंच पाऊल होत त्यामुळे अशी विसंगती कोणी मनावर घेतली नाही. पण हेच पाऊलं पुढे जगाला सर्वात मोठी सिनेसृष्टी देईल ह्याची कल्पना त्याकाळी कोणालाच नसावी. (क्रमश)

Comments

Popular posts from this blog

आजीबाईंचा सिनेमा

धन्यवाद साहेब

अदालत की कारवाई