2020
२००८ साली IPL चा पहिला सिझन झाला आणि भारतात एका नव्या युगाची नांदी झाली होती. खेळाच्या जुन्या सर्व संकल्पना, रूढी, गेमप्लॅन, रीतिरिवाज, संघभावना मोडीत काढत क्रिकेटविश्वात एका नव्या युगाचा आरंभ झाला होता.
हे युग होत २०-२० क्रिकेटच !!
अनेक आजी-माजी खेळाडूंनी ह्यावर टीकेची झोड उडवली. क्रिकेटचा सत्यानाश होईल ही भविष्यवाणी वर्तवली गेली. पैशांची उधळपट्टी, चियरगर्ल्स संस्कृती, सामन्यानंतरच्या पार्ट्या, ग्लॅडीएटरसारखे लिलाव करून घेतले जाणारे खेळाडू हे सर्व नविन होत.
हे २०-२० युग काय दाखवणार होत ह्याची झलक पहिल्याच सिझनला दिसली.
द्रविड, कुंबळेचा बेंगलोर संघ T20 च्या वेशातील कसोटी संघ म्हणुन हिणवला गेला,
सचिन, सौरवचे प्रबळ दावेदार संघ तळाशी राहिले, राजस्थान रॉयलसारखा अनपेक्षित संघ बाजी मारून गेला, स्वप्नील असनोडकर, धवल कुलकर्णी, अशोक दिंडा वैगेरे हिरो मानले गेले.
त्या त्या देशाचे खेळाडू इथे पैसे जास्त मिळतात म्हणून स्वतःच्या देशातील क्रिकेट सोडून इथे खेळू लागल्याने "क्लब मोठा की देश?" अशा चर्चा रंगू लागल्या.
केवळ देशच काय पण IPL च्या एका संघाशी एकनिष्ठ राहणेही अवघड होऊ लागले. देशाच्या निवडणुकांपेक्षा IPL मोठी वाटू लागल्याने आयोजकांनी नंतर एकदा तर थेट साऊथ आफ्रिकेत आयोजन केले.
आज जवळपास एक तप उलटून गेलं आहे.
त्यावेळेस २०-२० क्रिकेटने जे नविन धडे शिकवले ते आता ह्या सन २०२० मध्ये अनुभवायला मिळाले.
काय नाही झालं ह्या वर्षात.?? कालपर्यंत एकमेकांच्या उरावर बसणारे विरोधक एकमेकांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसू लागले,
एखाद्याचा अनुभव, कौशल्य, ज्येष्ठता ह्यांच्या व्याख्या व्यक्तीनुसार बदलू लागल्या.
पक्षनिष्ठेपेक्षा उपयुक्ततावाद बोकाळला.
ह्या गोष्टी निदान राजकीय क्षेत्रातल्या होत्या. पण कॉर्पोरेट क्षेत्रात तरी काय वेगळं झालं?
कोरोनाची साथ आली क्षणात हजारोना घरी बसावं लागलं !! जिथे कित्येक दिवस तहान भूक विसरून काम केले तिथे अनेकांना डच्चू मिळाला.!! Work from home ने तुमच्या फिल्डवरच्या आस्तित्वालाच वेगळे परिमाण दिले. कित्येक जण स्वतःचा जीव मुठीत घेऊन कर्मभूमीपासून दूर निघून गेले.
संकटकाळात साथ देणाऱ्यांची क्षणभंगुरता अनुभवायला मिळाली. मृत कोरोना रुग्णांना त्यांचे नातेवाईक सुद्धा हात लावायला कचरताना बघायला मिळाले.
कसोटी क्रिकेटप्रमाणे इथे सेट होण्यास टाईम कोणाकडेच नव्हता, जे करायचे होते ते झटपट !!!
अशातच टोळधाड, चक्रीवादळ, भूकंप, महापूर अशा अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या पण रडण्यासही फुरसत मिळाली नाही, इतका वेग आयुष्याला मिळाला आहे.
हे २०२० वर्ष सर्वार्थाने यादगार राहील. डोळ्यांना न दिसणाऱ्या एका अतिसूक्ष्म जीवाने सर्व जगाला गुडघ्यावर बसायला भाग पाडले. अमेरिका, इंग्लंड सारख्या महासत्ता हवालदिलं झाल्या. !!!
थाळ्या वाजवणे, दिवे लावणे ह्या प्रकारांची कितीही खिल्ली उडवली गेली तरी अंतिमत: तेच कटुसत्य आहे. मृतांचे वाढते आकडे वाचून आपण जिवंत राहतोय, ही भावणासुद्धा आता सेलिब्रेशन करण्यासारखीच भासु लागली आहे.
IPL नेजी प्रत्येक चौकार-षटकारावर जल्लोष करत सुटण्याची संस्कृती रुजवली हे त्याचेच फलित आहे.
आपल्याला प्रत्येक गोष्टीला इव्हेंट करण्याची सवय लागली आहे. उद्या आपण संघात, ऑफिसात किंवा जगात असू किंवा नसू ह्या भीतीच्या भावनेने ही चियर्स संस्कृती मूळ धरत आहे. सोशल मीडियावर दर दिवशी येणारे नवे ट्रेंड्सही त्याचच एक रूप !!
आता जून संपत आला आहे, अजुन अर्ध वर्ष बाकी आहे. म्हणजे पुर्ण दुसरी इनिंग बाकी आहे. अजुन काय बघायला मिळणार कोणास ठाऊक....अस वाटतय कोणीतरी कानात जोराने तो IPL चा ट्रम्पेट वाजवत आहे.
--- सौरभ रत्नपारखी
Comments