अंडरटेकर

आयुष्याच्या रहाटघाडग्यात काही माणसे अशी भेटतात कि त्यांचा आणि तुमचा काहीच संबंध नसतो पण त्यांचं डोळ्याआड जाणं तुम्हाला रुखरुख लावुन जात ! WWE CHAMPION अंडरटेकर हे नाव अशाच काही लोकांपैकी एक ! तुफान आदळआपट आणि हाणामारी असलेल्या ह्या खेळाबद्दल मला फारसं आकर्षण कधीच नव्हतं पण शालेय जीवनात इतर मित्रांमध्ये ह्याची क्रेझ होती म्हणून त्याची माहिती ठेवावी लागायची !! त्यातूनच अनेक नावे परिचित झाली होती, ट्रिपल एच, रॉक, योकोझुना, शॉन मायकल, केन असे एकापेक्षा एक धिप्पाड गडी ओळखीचे झाले. ह्या सर्वामध्ये अंडरटेकरबद्दल तर खूप कुतूहल होत. त्याची अंधारात होणारी एंट्री, चितपरिचित पार्श्वसंगीत, दिव्यांचा लखलखाट, आणि चाहत्यांचा जल्लोष हे सारं पाहुन आता बरीच वर्षे लोटली !! अंडरटेकर पुन्हा पुन्हा जन्म घेतो, त्याचाकडे स्पेशल पॉवर आहे, एका बाटलीत त्याचे प्राण आहे अशा भाकडकथावर विश्वास ठेवण्याच तेे दिवस होते. हे लोक खरच हाणामारी करतात की लुटुपुटीची असते हे शेवटपर्यत कळायचं नाही. कॉम्प्युटरच्या किंवा टीव्हीच्या व्हिडीओ गेममध्ये सुद्धा त्यांना घेऊन मारामारी करण्याची गंमतच न्यारी होती. पुढे महाविद्यालयात पाय ठेवल्यानंतर हि मंडळी मागे पडली. सचिन, सौरव, राहुल व इतरांनी क्रिकेटचा सुवर्णकाळ दाखवल्याने wwf बद्दल आकर्षण राहील नाही. कालपरत्वे सचिन, सौरव सुद्धा निवृत्त झाल्यानंतर आज इतक्या वर्षांनी अंडरटेकर निवृत्त झाल्याची बातमी ऐकुन हिंदी सिनेमातल्या फ्लॅशबॅकसारखे जुने दिवस आठवले. खरंच काळ कोणासाठीच थांबत नाही. आजही कदाचित कपाटातल्या एखाद्या कोपऱ्यात wwf च्या पत्त्यांचा कॅट पडलेला असेल ! एकेकाचे वजन, उंची, बायसेप्सची आकडेवारी आणि त्या अनुषंगाने खेळायचा खेळ तसाच आठवतो पण पूर्वीसारखी मजा येणार नाही कारण कुठेतरी थांबावं लागतच...अंडरटेकर थांबला तसा !!!! सौरभ रत्नपारखी

Comments

Onkar said…
बालपण परत डोळ्यासमोर तरळलं. खुप छान लेख.👌👌

Popular posts from this blog

मंगरुळ तें वॉशिंग्टन

तुघलक

ताजमहल