शब्द जैसे कल्लोळ

#शब्द_जैसे_कल्लोळ भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याच्या आदल्या दिवशीची गोष्ट ! पंडित नेहरू आपल्या पहिल्या भाषणाची तयारी करत होते. त्यांच्या सचिवाने त्या भाषणाचा मसुदा त्यांच्यासमोर ठेवला. तो काळजीपुर्वक वाचल्यावर नेहरूंनी त्यातल्या 'Date with destiny'च्या जागी 'Tryst with destiny' हा बदल करायला सांगितले. कारण 'Date'चा एक अर्थ प्रेयसीसोबत भेटीच्या अर्थाने होतो. पण स्वातंत्र्यानंतरचे पहिले भाषण असल्याने त्याचे ऐतिहासिक मोल नेहरूंना ठाऊक होते. देशाच्या भविष्यातील वाटचालीची दिशा त्या भाषणातून दाखवायची 'जाण आणि भान' त्यांच्याकडे होत. आज पार्थ पवारांचं पहिलच भाषण नेटकऱ्यांमध्ये ट्रोलिंगचा विषय झालं. असाच अनुभव राहुल गांधींनी अर्णव गोस्वामीला दिलेल्या पहिल्या मुलाखतीत आला होता. आता ह्यात दोष कोणाला द्यावा? कारण ही मंडळी ज्या पेज थ्री वर्तुळात वावरली आहे त्यांची सर्वसामान्य भारतीयाशी असलेली नाळ कधीच तुटलेली आहे. लहानपणापासून आजूबाजूला वावरणारे लोक एकतर राजघराण्यातले, उद्योगातले, किंवा सहकारसम्राट बिरुद असलेले ! कपिल सिब्बल, शशी थरूर, दिग्विजयसिंग, ज्योतिरादित्य सिंदिया ही मंडळी कोणत्याही सामाजिक चळवळीतून वर आलेली नाही, त्यात परत राहुल गांधींच्याभोवती सुरक्षेच्या कारणास्तव तयार झालेल्या पोलादी चौकटी त्यांनाच भेदता आल्या नाही. ह्या सर्वांचा परिपाक म्हणजे लोकांपासून आलेला दुरावा ! खरतर नेहरू सुद्धा सुखवस्तू कुटूंबातले होते. पण महात्मा गांधींच्या संपर्कात आल्यानंतर उंची कपडे घालणाऱ्या नेहरूंची वेशभूषा देखिल बदलली. इतकी की त्यांच्या शर्टला 'नेहरू शर्ट' म्हटले जाऊ लागले. आजच्या पुढच्या पिढीतील नेत्यांमध्ये या गोष्टीची जाणीवच दिसुन येत नाही. महात्मा गांधीसारखा नेता बॅरिस्टर असुन पंचा नेसून का वावरत राहिला? हे लक्षात घेता आले पाहिजे. राहुल गांधींना '८४ च्या दंगलीबद्दल' प्रश्न विचारला गेल्यावर उत्तरे मिळाली ती 'RTI, महिला सबलीकरण' ह्यांची ! माध्यमांच्या युगात ह्या गोष्टी फार दुष्परिणामकारक ठरतात.जगातील अनेक नेते अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर सत्तास्थानी पोहोचले आहेत. अगदी हिटलर, मार्टिन ल्युथर किंगपासून राज ठाकरे ह्यांच्यापर्यत उदाहरणे दिसून येतील. एखाद लहान मुलं देखिल शाळेत भाषणाची तयार करताना कष्ट करून तयारी करते मग सर्व रेडिमेड मिळत असताना आजच्या नेत्यांना हे का जमु नये? मोदी विरोधकांना अद्याप हे कळलेले नाही की त्यांचे शब्द हीदेखील त्यांची मोठी ताकद आहे. 'मनकी बात' असो अथवा 'व्हिडीओ कॉन्फरन्स' ते सातत्याने लोकांच्या संपर्कात आहे. त्यामुळे पुर्वीच्या सरकारच्या तुलनेत त्यांचा हा गुण उठून दिसतो. निवडून आल्यानंतर ५ वर्ष तोंड दाखवायला आले नाही अशी म्हणायची सोयदेखिल राहिली नाही कारण भाजपा नेतृत्वाकडे कोणत्याही कारणाने कायम प्रकाशझोतात राहणाऱ्या फर्ड्या वक्त्यांचा मोठा स्टॉक आहे. अगदी महाराष्ट्रापुरता बोलायचं झालं तर उद्धव ठाकरे हे वक्ते म्हणून फारसे लोकप्रिय नाहीत, तरी वडिलांच्या छत्रछायेत न राहता स्वतःच्या प्रतिमेशी प्रामाणिक राहत त्यांनी शिवसेनेला अद्याप टिकवून ठेवलं आहे व स्वतंत्र लढून देखिल सत्तेपर्यत पोहोचवलं कारण जनमाणसाला काय हवं आहे हे त्यांना ठाऊक आहे. दुसऱ्याची कॉपी करताना येणाऱ्या मर्यादा त्यांना ठाऊक आहे. शिवसेना घडताना त्यांनी डोळ्यासमोर पाहिली आहे. आज निवडणुकीचे पडघम वाजत असताना विरोधकांना अद्याप मोदींचे सामर्थ्य ओळखू येत नसेल तर एवढंच सांगावंस वाटत ‘मितुले सरळ। साच आणि मवाळ। शब्द जैसे कल्लोळ। अमृताचे॥ तर पेरिले ते उगवते। बोलिल्यासारखे उत्तर येते। तरी मग कर्कश बोलावे ते। काय निमित्य !" ©सौरभ रत्नपारखी

Comments

Popular posts from this blog

मंगरुळ तें वॉशिंग्टन

तुघलक

ताजमहल