असंतोषाच्या उंबरठ्यावर

'फेसबुक-व्हाट्सएप' एक झाले. 'आयडिया-वोडाफोन' एक झाले, 'झोमॅटो-उबेर इटस' एक झाले, या शतकाच्या सुरुवातीला दखलपात्र नसणाऱ्या किंवा अस्तित्वातच नसणाऱ्या या कंपन्यांनी अल्पावधीत मार्केटमध्ये स्वतःच नाव कमावलं. किंवा नाहीशा झाल्या. गेल्या वीस वर्षांत असे अनेक मर्जर-एक्विजिशन झाले आहेत. वरवर सर्वसाधारण वाटणाऱ्या या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. मार्क झुकरबर्ग सारखा तरुण स्वतःची कंपनी सुरू करतो काय आणि पिढ्यानपिढ्या उद्योगात काढलेल्या लोकांना मागे टाकून श्रीमंत लोकांच्या यादीत नाव कमावतो काय हे सगळं विस्मयकारक आहे. केवळ टाटा-बिर्ला नाव ऐकायची सवय असलेल्या भारतीयांनी अंबानी-अदानी नावे घ्यायला कधी सुरुवात केली हेच कळले नाही. एकेकाळी मार्केटवर अधिराज्य गाजवणारे कोडॅक, BSNL, जनरल मोटर्स सारखे दिग्गज मागे पडुन त्या क्षितिजावर नविन नावे दिसु लागली आहेत. अमेझॉन, फ्लिपकार्ट वैगेरे नावे माहीत नसलेली मंडळी आज दुकानात जाण्याचे कष्ट न घेता घरबसल्या ऑफर्स बघून ऑर्डर देत आहेत. इतके एप्स, वेबसाईट झाल्यानंतर सरकारी कार्यालयातुन मनुष्यबळ कमी करा म्हणुन ओरड होत आहे. तर दुसरीकडे दुकानदाऱ्या आणि खासगी व्यवसाय अडचणीत आले आहेत. एसटीडी बूथ किंवा त्याला जोडून असलेले स्पर्धा परीक्षांचे फॉर्म भरून घेणारे पण नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत, किंबहुना झाले आहेत. पोस्टखात्याला तर आता पत्र तर जाऊद्या मनिऑर्डर पाठवण्यापूरता तरी काम राहील की नाही शंका आहे. दुसरीकडे 'मन मै है विश्वास' म्हणत MPSC ची प्रिलिम पास झालो पण मेन्स दोन मार्काने हुकली म्हणनाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. टपऱ्या उघडाव्या तशि इंजिनिअरिंग कॉलेजेस उभारली गेलीत आणि आता रिक्षावाल्याने 'दोन सीट ! दोन सीट !' ओरडावे अशी संस्थाचालक व प्राध्यापकांची अवस्था झाली आहे. अस्थिर काळात नविन कंपन्या सुरू होण्याची शक्यता दिसत नाहीए आणि इनबॉक्समध्ये मित्रांचे मेसेज येऊन धडकत आहे की 'कुठे जॉब असेल तर सांग रे' हे खुप भयानक चित्र आहे. झपाट्याने बदलणारे मार्केट आणि रोजगारनिर्मिती ह्यांचा ताळमेळ बसला नाही तर येणाऱ्या काळात रिकाम्या तरुणांमध्ये जो असंतोष उफाळून येईल त्याची कल्पना करणे अशक्य आहे. - सौरभ रत्नपारखी

Comments

Popular posts from this blog

मंगरुळ तें वॉशिंग्टन

तुघलक

ताजमहल