तिशीपारचे आम्ही
खरतर हे आत्मचरित्र लिहायचं वय नाही, पण काल उद्धव साहेबांना अयोध्येत महाआरती करताना पाहिलं वाटलं की काळाच एक आवर्तन पुर्ण होतंय.
जेव्हा ह्या जगात आलो व थोडफार समजु लागलं तेव्हा टीव्हीवर रामायण मालिका चालू होती. नंतर तिची जागा महाभारतने घेतली.
टीव्ही बघायचं आणि जत्रेतील धनुष्यबाण आणून खेळायचं ते वय होत. बाहेरच्या जगात मंडल/कमंडलच राजकारण चालू होतं ते कळत नव्हतं.
पुढे राजीव गांधी स्फोटात मारले गेल्याची बातमी म्हणजे आजच्या भाषेत ब्रेकिंग न्युज पाहिल्याचं आठवत.
शाळेत जाऊ लागलो तेव्हा देश माझ्यासोबतच उदारीकरणाच्या दिशेने जाऊ लागला होता. लिहिता- वाचता येऊ लागल्याचा आनंद होता. नाशिकच्या कुंभमेळ्यात शहरातील भिंतीवर लिहिलेले 'मंदिर वही बनाएंगे'चे नारे वाचत घरी परत यायचो.
पुढे वातावरण बदलत गेलं.
शाळेला अचानक सुट्टी मिळाली होती. देशात काहीतरी घडलं होत.
रस्त्यावर एखादी बॅग पडली असेल तर उचलत जाऊ नको असं घरातले सांगायचे कारण स्फोट होतो.
एकदा घरी भल्या पहाटे उठवलं गेलं किल्लारीला भुकंप झाला होता. टीव्हीवर ते दृश्य पुन्हापुन्हा दाखवत होते. तेव्हा अलिफ लैला, चंद्रकांता बघायला आवडत होत. ज्यांच्याकडे केबल टीव्ही तो श्रीमंत वाटायचा.
माध्यमिक शाळेत पाय ठेवले तेव्हा नव्या जगात पाय ठेवला अस वाटलं कारण नवीन शाळा, नवीन मित्र एवढंच काय पण सरकारही नवे !!
नवीन शाळेतल्या संगणक कक्षात जाताना मंदिरात जावं अस पायातील बूट-चपला बाहेर काढून जायचो. 'लांबुन बघायचं हात लावायचा नाही' ही ताकीद मिळाली होती. कॉम्प्युटर शिकला नाही तर पुढे स्कोप नाही असं सर म्हणाले. पेंटब्रशवर चित्र काढता आलं ही मोठी अचिव्हमेंट होती.
तेव्हा लोकप्रिय होऊ लागलेल्या शाहरुख, सलमान, आमिरसारखे शर्ट विकत घ्यायची फॅशन निघाली होती.
दरम्यान क्रिकेट खेळायला आवडू लागलं होतं. कपिल रिटायर्ड होऊन सचिन नविन आयकॉन झाला होता. लवकरच शाळेच्या स्पोर्ट्सरूममध्ये सचिनच्या जोडीला सौरभ-राहुलचे पोस्टर लागले.
शाळेत शिकवलं जात होतं की पाच वर्षांनी प्रधानमंत्री बदलला जातो, पण शालेय शिक्षण पुर्ण होता होता तीन-चार प्रधानमंत्री झाले.
पोखरण, कारगिल, कंदाहार अशी वळणे घेत गाडी कॉलेजात पोहोचली.
गोध्रा पेटून उठल होत, कच्छला भुकंप झाला होता.
इंजिनियरिंगमध्ये शियर फोर्स- बेंडींग मुमेंट शिकत असताना वर्ल्ड ट्रेड सेंटर पडताना पाहत होतो. हे आपल्या शिक्षणाबाहेरच फेल्युअर आहे हे कळलं !!!
मग पुढे आकड्याचा खेळ सुरू झाला. ९/११, २६/७, २६/११ अशा भाषेत आपत्ती सांगितल्या जाऊ लागल्या. अमेरिकेने सद्दाम, लादेन, गद्दाफी संपवले. एक कृष्णवर्णीय व्यक्ती त्यांची राष्ट्राध्यक्ष झाली हा इतिहास घडत होता. भारतात प्रथमच एक महिला राष्ट्रपती झाली होती. संजुबाबा जेलमधून सुटून बाहेर आला.
पेजर, वॉकमॅन, कॅसेट, एसटीडी बुथ, फ्लॉपी, अलार्म क्लॉक बघतात बघता नाहीसे झाले.
दरम्यान शिक्षण पूर्ण झाल ऑर्कुट, फेसबुक मुळे जग जवळ आल अस वाटत होतं पण तिथेही जातीय आरक्षणाचे ग्रुप्स तयार झाले. सचिनच्या जागी विराटचे पोस्टर आले. खान मंडळींची पुढची पिढी सिनेमात यायला तयार झाली. पुन्हा राममंदिराचा मुद्दा आला. पुन्हा हिंदुत्वाचे वारे वाहू लागले. मंडल-कमंडलचे राजकारण पुन्हा पटलावर आले.
आता आपल्या लहान मुलाचे दोन्ही हात श्रीरामाच्या मूर्तीसमोर जोडून "जै जै बाप्पा" म्हणायचे दिवस आले.
एक आवर्तन पुर्ण झालं. !
©सौरभ रत्नपारखी
Comments