आजीबाईंचा सिनेमा
'लव्हके लिए कुछभी करेगा' या सिनेमात आज कपुर (स्नेहल दाबी) नावाच एक पात्र आहे. बॉलिवूडमध्ये हिरो बनण्याची इच्छा असलेल्या अस्लमभाईला (जॉनी लिव्हर) तो बड्या बड्या बाता मारून लुबाडतो.
आपले फिल्म इंडस्ट्रीत किती घनिष्ठ संबंध आहेत हे तो ज्या पद्धतीने जॉनी लिव्हरला सांगतो ते सीन पाहण्यासारखे आहे. हसून हसून पुरेवाट होते.
हा सिनेमा पाहताना मला आमच्या आजीची आठवण येते. एकदा ती जुन्या आठवणीत रमली की, फिल्म इंडस्ट्रीची मोठं मोठी नावे सहज बोलून जायची.
तिचं बालपण जुन्या नाशिकमध्ये गेलं होतं. तसा चित्रपटांचा आणि तिचा काही संबंध नव्हता, पण दादासाहेब फाळकेंच्या सोबत काम केलेली काही मंडळी नित्य परिचयाची होती.
आजी सहज बोलून जायची की आम्ही खेळता खेळता फाळकेंच्या स्टुडिओमध्ये चक्कर मारून यायचो आणि तिथे हरिश्चंद्र, तारामती वैगेरे पात्रांच्या वेशभूषेतील काही हार किंवा त्यांचे मणी सापडले की ते घरी कुतूहलाने घेऊन यायचो. (आजीच्या वयाचा हिशोब लावला तर कुठेच ताळमेळ लागत नसायचा), पण ती म्हणायची त्यात थोडेफार तथ्य असायचे कारण आमच्या जवळच दादासाहेब फाळकेंचा स्टुडिओ होता. पण वयोमानानुसार तिने चुकीचा चित्रपट सांगितला असावा.
गल्लीतीलच वझरे नावाचे एक गृहस्थ हिंदी सिनेमात हिरो झाले होते अस ती सांगायची तेव्हा आम्हाला ते खोट वाटायच पण पुढेमागे वाचनात आले की ते सांगत होती ते खरं होते.
शंकरराव वझरे नावाचे एक बॉलिवूड स्टार होते व किशोरकुमारने सुद्धा एक मुलाखतीत त्यांचे सिनेमे आवडायचे अस सांगितलं होतं.
सर्वात मोठा किस्सा म्हणजे 'दिलीपकुमारचा'!!
माझ्या पणजोबांचा म्हणजे आजीच्या वडिलांचा 'बियाण्यांचा व खतांचा' मोठा व्यापार होता त्यामुळे युसूफ खान वरचेवर भेटून जाई अस ती सांगायची. हा युसूफ खान म्हणजे दिलीपकुमार होता हे उशिराने कळलं.
आता हा पठाण माणुस नाशिकला बियाणे-खत घ्यायला का येईल?? पण नंतर आणखी एक गोष्ट वाचनात आली की त्याच बालपण नाशिकच्या देवळातील गेलं होतं. तिथल्या बार्न्स स्कुल मध्ये तो शिकला देखिल होता. तसेच त्याच्या घरचा फळांचा व्यापार होता.
आजी अशा अनेक आठवणी सांगायची त्यातल्या खऱ्या किती, खोट्या किती माहीत नाही पण एक नाशिककर म्हणून अभिमान वाटायचा. आजी म्हणायची आपल्या गल्लीतल्या त्या वेळच्या धनिक लोकांनी मदत केली नाही म्हणून फाळके मुंबईला गेले. (हरिश्चंद्राची फॅक्टरी पाहताना हे खरे असावं असं वाटलं).
मध्ये एकदा इथल्या स्थानिक वृत्तपत्रात वाचल की, दादासाहेब फाळकेंनी विजयानंद नाट्यगृहाचे चुंबळे ह्यांच्यासोबत नाशिकमध्ये प्रथमच सिनेमा रिलीज केला होता. अमावस्येच्या रात्री अंधारात नीट प्रक्षेपण होईल म्हणून मैदानात पडदा पण तसा लावला होता. पण हे फाळके नावाचे जादूगार कॅमेऱ्यातून प्राण शोषून पडद्यावर दाखवून जादूटोणा करतात अशी काहीशी गावभर अफवा पसरल्याने लोक काठ्या घेऊन त्यांना मारायला आले होते. ज्यात स्थानिक प्रशासनाला हस्तक्षेप करून वाद थांबवावा लागला.
त्याचठिकाणी बालगंधर्वांच्या 'संगीत शारदा' नाटकादरम्यान क्रांतिकारक अनंत कान्हेरेने जॅक्सनवर गोळ्या झाडल्या होत्या, त्या घटनेप्रमाणे ही देखिल ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल.
आज फाळके हयात नाहीत, आजीबाई पण वारल्या, फाळकेंच्या स्टुडिओची जागा विकत घेऊन कोण्या मुस्लिम गृहस्थाने घर बांधल आहे, युसूफ खानला उर्फ दिलीपकुमारला विस्मरणाचा आजार जडलाय. त्यामुळें ह्या आठवणींची सत्य-असत्यता तपासणे अवघड आहे.
नाशिककरांनी कोणे एकेकाळी शहराच पावित्र्य भंग पाऊ नये म्हणून रेल्वेला विरोध करून गावापासून खुप दूर ठेवले होते. काळाराम मंदिरात प्रवेशासाठी दलितांना सत्याग्रह करावा लागला होता.
आज नाशिक बदलल आहे. आता मेट्रोचे वेध लागले आहेत, काळाराम मंदिराचे पुजारी देखिल बसपाकडून निवडणुकिला उभे राहिले होते. चिन्मय उदगीरकर, मृणाल दुसानिस, अनिता दाते, अभिजित खांडकेकर ही मंडळी सिनेविश्वात झळकत आहेत.
'नवनिर्माण' करणाऱ्या प्रत्येक पक्षाचे इथे स्वागत होते.पण या साऱ्यात आजीबाईंच्या आठवणी हरवून गेल्या आहेत.
मध्ये एकदा वडिल घरी आल्यावर म्हणाले होते "अरे ! आज रामकुंडावर आमिर खान दिसला, पीके का काहीतरी नाव असलेल्या पिक्चरच शूटिंग चालु होत" यावेळेस मात्र मी विश्वास ठेवला 'हे खरं होत!!'
©सौरभ रत्नपारखी
#CinemaGully
Comments