नवचैतन्याची दोन दशके
जवळपास वीस वर्षांपुर्वी सर्व मराठी मुलखात चैतन्याच एक नविन वादळ आलं होतं, अल्फा मराठीच्या रूपाने !!
झी एंटरटेनमेंटसारख्या माध्यमक्षेत्रातील मोठया समुहाने पहिली मराठी खासगी मनोरंजन वाहिनी सुरू केली होती.
त्यापुर्वी बरीच वर्षे मराठी जनमानसात एक मरगळ निर्माण झाली होती.
संध्याकाळी 'दामिनी', रविवारी लक्ष्या-अशोकचे तेच चित्रपट पुन्हा पाहून चौकटीत अडकलेल्या मराठी प्रेक्षकांना एक सुखद धक्का बसला होता. दरम्यान मराठी चित्रपट आणि नाटके ह्यांच्यात पण ती मरगळ जाणवत होती. नविन प्रयोग, नविन कलावंत, नविन कथांचा दुष्काळ पडला होता. पण अल्फा मराठीच्या झंझावातात हे रूप पालटलं.
सुरुवातीला नायक, प्रपंच, पिंपळपान, हसा चकटफु, अशा एकेक मालिका करत असताना त्यांचा परीघ वाढत गेला.
आभाळमाया, वादळवाट ह्या मालिकांनी लोकप्रियतेचे मापदंड रचले.
घडलंय-बिघडलंय सारख्या कार्यक्रमानी वगनाट्य, प्रहसनातील मराठी विनोदाला नव्या ढंगात लोकांसमोर आणले.
'नक्षत्रांचे देणे'च्या रूपाने मराठी कवी, गीतकार, साहित्यिकांच कर्तृत्व पुन्हा नव्या पिढीसमोर आलं.
'अल्फा गौरव'च्या रूपाने तयार झालेल्या स्पर्धात्मक वातावरणातुन तयार झालेल्या चुरशीमुळे मराठी चित्रपटातसुद्धा बदलाचे वारे वाहू लागले.
अजय-अतुलने अल्फा गौरवच्या शिर्षक गीतातून तर संगीतविश्वाला सुद्धा नवे प्रयोग करायला उद्युक्त केले.
कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अल्फा महाकरंडक एकांकिका स्पर्धानी निवेदक म्हणून जितेंद्र जोशी सारखा तगडा कलावंत तर दिलाच पण सर्व मराठी तरुणाईला पुन्हा नाटकांकडे खेचून आले.
(अभिजित खांडकेकर, चिन्मय उदगीरकर, मृणाल दुसानिस ह्या माझ्या समवयस्क अभिनेत्यांनी नाशिकमध्ये जवळपास एकाच काळात अभिनयक्षेत्रात पदार्पण केले होते हे मी खूप जवळून अनुभवलं आहे)
दुसरीकडे ई टीव्ही मराठीची सुद्धा नांदी झाली. किमयागार, सांजसावल्या, ह्या गोजिरवाण्या घरात, चार दिवस सासूचे, सारख्या मालिकांना देखिल प्रेक्षकांनी उचलून धरले.
श्री अधिकारी ब्रदर्सने 'मी मराठी'ला प्रेक्षकांच्या भेटीला आणले तेव्हाच ते शिर्षक गीत आजही अनेकांच्या मोबाईल मध्ये रिंगटोन म्हणून असेल.
पुढे स्टार प्रवाह वरच्या अग्निहोत्र, राजा शिवछत्रपती वैगेरे मालिकाही गाजल्या.
दरम्यान हा पसारा वाढतच गेला, व मराठी टीव्ही माध्यमांमध्ये बातम्या, चित्रपट, संगीत ह्याला वाहिलेल्या स्वतंत्र वाहिन्या आल्या.
हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे कधी कधी अस वाटत की आपण खुप स्वार्थी आहोत, अनेक टीव्ही मालिका आपल्या दररोजच्या आयुष्याचा भाग बनल्या होत्या.
'अवघाची संसार, या सुखांनो या' वैगेरे मालिकांचे शेकडो एपिसोडस पाहताना आपण तहानभूक विसरून जायचो.
पण आता नविन मालिका आली की मागच्यांचा विसर पडत जातो.
आज ह्या पोस्टच्या निमित्ताने आदरांजली वाहूया त्या शेकडो मालिकांना ज्या आता टीव्हीवर लागत नाही. पण एकेकाळी आपल्या भावविश्वाचा भाग होत्या.
आजही घरात 'बंधन' मालिकेच्या रोड शो मध्ये मिळालेलं घड्याळ आहे. किंवा जवळपासच्या घरात 'होम मिनिस्टरच्या' शूटिंगच्या आठवणी आहेत.
एक सलाम त्या सर्व विस्मरणात गेलेल्या मालिकांना ज्यांनी गेली वीस वर्षे मराठी भावविश्व टिकवून ठेवलं आहे.
(टीप - काही नमुद करायचं विसरलो असेल तर नक्की नमुद करा)
#CinemaGully
Comments