इडियटपणाची दहा वर्षे
या ख्रिसमसला '3 इडियट्स' रिलीज होऊन दहा वर्षे झाली. गेले एक दशक हा सिनेमा स्वतःच 'कल्ट स्टेटस' आणि 'फॅन फॉलोविंग' टिकवून आहे.
हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा माझं स्वतःच आयुष्य फरहान कुरेशी - राजु रस्तोगी ह्या दोन पात्रांच्या मध्ये हिंदोळे खात होत. कारण त्यांच्याप्रमाणे मी देखिल मॅकेनिकल इंजिनियरिंगला होतो आणि डिप्लोमा/डिग्री/ड्रॉप अशी प्रदीर्घ 3D कारकिर्द झाली होती. त्यामुळे कधी एकदा या दलदलीतुन बाहेर पडतो अस झालं होतं, आणि अशातच 3 इडियट्स पाहिला....फर्स्ट डे फर्स्ट शो !!
मशीनची व्याख्या, परीक्षेच टेंशन, लास्ट इयरचा प्रोजेक्ट, हातात अंगठ्या घालणे, हे सगळं अनुभवत होतोच पण चित्रपटाने त्या भावना बोलक्या केल्या. त्या सुमारास दिल्ली व जवळपासच्या परिसरात 20 दिवसात 300 आत्महत्या झाल्या होत्या त्यातल्या बहुतेक इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या होत्या....रँचोच्या भाषेत 'वो सुसाईड नही था, मर्डर था...यह इंजिनियरभी कमालके होते है, ऐसा कोई मशीनही नही बनाया जो दिमागके अंदरका प्रेशर नाप सके'
एकूणच दारुण परिस्थिती होती. पण '3 इडियट्स' रिलीज झाला आणि ह्यात कमालीची घट झाली. एका बातमीत तर वाचल की बँकेत एका मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने 'बहती हवा सा था वो' गाणं ऐकून स्वतःच्या तगड्या पगाराच्या नोकरीचा राजीनामा दिला कारण त्याला जाणिव झाली की 'ह्या पैशाच्या मागे धावताना मी स्वतःला कुठेतरी मागे सोडलय.'
रँचो, फरहान, राजु, चतुर, जॉय....ही सगळी पात्रे प्रतिकात्मक होती. चेतन भगतच 'फाईव्ह पॉइंट समवन' वाचल होत त्यामुळे कथानक माहीत होतं, पण हिरानी-जोशी जोडीने पडद्यावर तेवढंच सुंदररित्या साकारल.
बॉलिवूडचे कथानायक हे तोवर चाकोरीबद्ध होते, पण '3 इडियट्स'ने तो पायंडा मोडला.
'हम स्पेसमे पेन्सिलका इस्तेमाल क्यु नही करते?' असा भाबडा प्रश्न विचारणारा किंवा नायिकेच्या हातातल्या जुन्या घड्याळावरून तिचं अंतरंग ओळखणारा नायक विरळा होता. एरवी 'बी.ए.पास झाल्यावर आनंदात घरी धावत येणारा आणि गाजरका हलवा खाणाऱ्या टिपिकल नायकापेक्षा हा एक पाऊल पुढे गेला होता. पैसे कमावण्यापेक्षा लड्डाखच्या गिरीकुंदरातील मुलांसाठी शाळा काढणारा रँचो म्हणूनच सर्वाना भावला.
आज फेसबूकची फ्रेंडलिस्ट पाहिली की तिच्यात अनेक 'चतुर रामलिंगम' दिसतात, आयुष्यात 'यशस्वी' होण्याची त्यांची महत्वाकांक्षा इतकी आहे की शाळा-कॉलेजच्या व्हाट्सएप ग्रुपवर पण ही मंडळी थांबत नाही.
'3 इडियट्स'ने आयुष्याची ही विविध रूपे नकळत दाखवली. आमिर खानचे 'दिलं चाहता है, रंग दे बसंती आणि 3 इडियट्स' हे आमच्या तारुण्याचे तीन टप्पे होते.
'काबिल बनो, कामयाबी झक मारके पिछे आएगी' हा गेल्या दशकभरातल्या अनेक इंजिनियर्ससाठी प्रेरणामंत्र ठरला आहे.
'ऑल इज वेल' म्हटल्याने प्रॉब्लम सुटत नाही पण सहन करण्याची शक्ती येते हेही अनुभवले.
'रणछोडदास श्यामलदास चांचड' (ufff फुंसुक वांगडू) असाच येणाऱ्या पिढ्यांना मनसोक्त जगण्याचे बळ देवो ही सदिच्छा !
(टीप - ह्या सिनेमानंतर अस्मादिक इंजिनियरिंग फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण झाले, हातातली अंगठी काढून इंटरव्ह्यूला गेल्याने शासकीय नोकरीत लागले. सध्या ब्लॉगर-लेखक म्हणुन ओळखले जातात, हा योगायोग की प्रभाव ते माहीत नाही 😁)
----- सौरभ रत्नपारखी
#CinemaGully
Comments