बॉलीवुडची देशभक्ती

26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला मला अलार्म लावून उठायची गरज कधीच पडली नाही कारण ते काम मनोजकुमारचे चित्रपट गल्लीत मोठ्या आवाजात लावलेल्या म्युजिक सिस्टीमद्वारे करत असत. मंडपात आलेल्या वधू वरासाठी "बहारो फुल बरसाओ" हे जस mandatary song आहे तस देशभक्तीपर सकाळ ही महेंद्र कपुरांच्या आवाजात "आ आ आ आ मेरे देश की धरती"ने होते. तीच जर शिवजयंती असली की सकाळ "प्रतापगडच्या पायथ्याशी खान आ आ आ आ" अशी होतें (दोन्ही आलापातील सुरावट वेगळी आहे ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी). तर सांगायचा मुद्दा हा की बॉलीवूड आणि देशभक्ती ह्यांचे अतूट नाते आहे. विदेशी ताकदके देशको मिटानेके नापाक इरादे ध्वस्त करण्यासाठी अमिताभ ते अक्की अशा बऱ्याच जणांनी यथाशक्ती योगदान दिले आहे. इंग्रज भारत सोडून जाताना पाठीमागे चहा, क्रिकेट, थँक यु, सॉरी, टॉम अल्टर…! असा बराच ऐवज सोडून गेले होते. टॉम अल्टर हा दीर्घकाळ विदेशी हुकूमतचा प्रतिनिधी होता. पुढे शक्तिमान आणि कॅप्टन व्योमने त्याला गुरू मानल्यामुळे आम्ही त्याचा राग धरणे सोडून दिले. त्याचाच दुसरा भाऊबंद म्हणजे बॉब ख्रिस्टो ! मिस्टर इंडियाने त्याला 'जै बज्रंग बली' म्हणायला लावल्याने आम्ही बच्चे कंपनी जाम खुश असायचो ! बिचाऱ्याची सोन्या मारुतीकडून (सोन्याच्या मारुतीकडून) खूप धुलाई होते. मिस्टर इंडिया त्याला मारतोय हे पाहण्यासाठी मी लाल चष्मा घालून टीव्ही समोर बसल्याचेही स्मरते पण मिस्टर इंडिया तसा न दिसल्याने निराशा झाली. हे दोघे उपलब्ध न झाल्यास मोगेम्बो, डॉ.डॅंग,,चिंकारा, प्रलयनाथ गुंडास्वामी, वैगेरे देशी वाणाची मंडळी हे काम इमानेइतबारे करत असत. भारत सरकारने पाकिस्तान बरोबर युद्ध करण्यापेक्षा अजित डोवाल ह्यांना पाठवुन त्यांच्या मिसाईलचे सर्व फ्यूज कंडक्टर काढून आणले आहेत अशी स्वप्न कधी कधी मला पडतात. अतिशय दुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीत प्रलयनाथ गेंडास्वामीसाठी मिसाईल बनवून देणारे थोर शास्त्रज्ञ भारताकडे असताना विक्रम लँडरशी संपर्क कसा होऊ शकत नाही हेही एक कोड आहे. असो !! या सर्वात मला भावलेला अभिनेता म्हणजे सनी पाजी !! हा गडी एकटा पाकिस्तानात जाऊन हँडपंप उखाडून पाच पंचवीस पाकिस्तानी झोडपून वन पीसमध्ये परत येतो हे खूप महान दृश्य आहे. त्याहून थोर दृश्य म्हणजे मनोजकुमार कोण्या एका क्लार्क नामे सिनेमात उपचार न करणाऱ्या डॉक्टरला खडे बोल सुनावतो आणि रेडिओवर 'कदम कदम बढाए जा' गाणं लावताच अंथरुणाला खिळलेलें दादामुनी उठून कदमताल करू लागतात. कांटे सिनेमातली गॅंग ही खरतर गुन्हेगारी करणाऱ्यांची टोळी..! पण एका दृश्यात सुनीलअण्णा म्हणतो की "हिंदुस्थानी कहीभी हो दो चिजे सहता नही, क्रिकेटमें हार और देशपे वार" अस म्हणत एका शस्त्र विक्रेत्याला उंचावरून फेकतो तेव्हा पब्लिक ते गुन्हेगार आहेत हेच विसरून जाते (भाई फुल टाळ्या आणि शिट्या) बॉलिवूडच्या अतिशयोक्तीपुर्ण देशप्रेमाला अशी विनोदाची झालर आहे पण खरं सांगू? बॉर्डर मधला मेजर कुलदीप सिंग लोंगोवालाच्या बॉर्डरवर उभा राहतोना तेव्हा माँ कसम त्याच्या पाठीमागे रायफल घेऊन 'जो बोले सो निहाल" म्हणण्याची इच्छा होते. रोझा मध्ये तिरंगा पेटवला जातो तेव्हा खुर्ची सोडून नायकासोबत तो झेंडा विझवायला आपण झेपावलो जातो. सरफरोशमधला इन्स्पेक्टर सलीम जेव्हा म्हणतो ना "मुसलमान का मतलब जानते हो?" तेव्हा थिएटरमध्ये होणारा जल्लोष पैसावसुल असतो. उरीमध्ये आपल्या वडिलांना मानवंदना देणाऱ्या लहान मुलीचा आक्रोश त्या ज्ञात अज्ञात विरांना सॅल्युट करायला भाग पाडतो. 'स्वदेस' पाहून देशात परत आलेले पण खूप आहेत आणि 'लक्ष्य' पाहून सैन्यात जाणारे पण आहेत. हे वेड चिरकाल राहील. थोडक्यात "ए वतन वतन मेरे आबाद रहे तु..!" सौरभ रत्नपारखी #CinemaGully

Comments

Popular posts from this blog

मंगरुळ तें वॉशिंग्टन

तुघलक

ताजमहल