झुंज
'दोघांची झुंज लावून मजा पाहणे' हि मानवजातीची जुनी परंपरा आहे.
कोंबड्यांपासून ग्लॅडिएटर पर्यँत झुंजीचे अनेक प्रकार व रक्तपात पाहिले गेले आहेत. सध्या ह्यामध्ये 'वैचारिक झुंज' लावणाऱ्या लोकांचा नवा पंथ उदयास आला आहे.
भारतात प्रत्येक जाती-धर्मात महापुरुषांची कमतरता नाहीच त्यामुळे फेसबुक-व्हाट्सअपवर 'तुमचा महापुरुष श्रेष्ठ कि आमचा?' अशी वर्गवारी करून पोस्ट करायची.
आणि ह्यावर समोरचा डिवचला गेला कि तो आणखी काही लोकांना टॅग किंवा ऍड करून मदतीला बोलवतो.
मग बाबा आदमच्या जमान्यात घडलेल्या कोणत्या तरी घटनेचा किंवा वक्तव्याचा पुरावा अथवा स्क्रीनशॉट म्हणून फोटो टाकला जातो.
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे व्हाट्सअप इतिहासकार मग दोन चार फॉरवर्ड झालेल्या मेसेजच्या जीवावर समोरच्याला निरुत्तर करण्याचा प्रयत्न करतात कारण अशा लोकांनी वाचनालयात जाऊन कधी पुस्तके चाळली असतील ह्याची सुतराम शक्यता नसते. अमक्या महापुरुषाने 40 लढाया जिंकल्या म्हटले की दुसऱ्याच्या नावावर 200 लढाया जिंकल्याची थाप मारली जाते.
त्या महापुरुषाने आयुष्यात कधीही न जिंकलेल्या लढाया त्याच्या नावावर खपवल्या जातात कारण आम्हाला वाद जिंकायचा असतो म्हणून आम्ही त्यांच्या खांद्यांचा सोईस्कर वापर करतो.
जर चुकून पण अशा फेक मेसेजेसना विरोध केला तर तुमची खैर नाही समझा कारण लोक तुमच्यावर कोणत्या तरी पक्ष- संघटनेचा शिक्का मारून मोकळे होतात.
ज्यांना बँकेत गेल्यावर स्वतःच्या हाताने सेव्हिंगचा फॉर्मही भरता येत नाही ते लोक नोटाबंदीचे फायदे शिकवतात.
टिळक, नेहरू, सावरकर, गांधी वैगेरे थोर लोक म्हणजे आपले batchmate होते अशा अविर्भावात त्यांचे कुठे चुकले हे सांगितले जाते.
ह्या फेसबुकीय विचारवंतांनी कधी अंदमानात कोलू फिरवलेला नसतो,
मूठभर मीठ उचलताना सुद्धा त्यांच्या पाठीशी हजारोच्या संख्येने लोक उभे राहिलेले नसतात
एकाच वेळी फाळणी, काश्मीर, विलीनीकरण, नियोजन, चीनच युद्ध सांभाळताना नेहरूंनी दाखवलेले मानसिक स्थैर्य ह्या लोकात नसते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उपाशीपोटी राहून केलेला पुस्तकांचा अफाट संग्रह ह्या फेसबुकवाल्याना झेपणारा नसतो.
त्यांच्याच शब्दात सांगायचं तर 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' ह्या सुभाषिताचा सोईस्कर अर्थ काढून 'चार-पाच मेसेजेस मध्ये सुशिक्षित होतात, टॅग करून संघटित होतात आणि वैचारिक संघर्ष नंतर ठरलेलाच असतो.
कधी कधी असं वाटत अज्ञानात खूप सुख असत, बालपणी शाळेत वाचलेल्या चाचा नेहरुंच्या गोष्टी,
चौथीचा शिवरायांचा इतिहास, अभिनव भारताच्या क्रांतिकथा ह्यापुरताच आपले वाचन राहिले असते तर बरे झाले असते असे वाटत. निदान अशा झुंजीत भाग घेण्याचं पाप अंगी लागल नसत.
@सौरभ रत्नपारखी
Comments