विरक्त होताना
जवळपास 20 वर्षांपूर्वी SSC संपवुन कॉलेजच्या विश्वात पदार्पण केल होत. दोन दशके उलटली त्याला !!! आयुष्य मजेत चालू होतं. शहरात मल्टीप्लेक्स नव्याने सूरु झाले होते., मॉल उभे राहिले होते, कॉलसेंटर मध्ये काम करणाऱ्या मित्रांच्या हातात पैसा खेळू लागला होता, ऑर्कुटमुळे जग एका क्लिकवर समोर आलं होतं. आयटी सेकटरमुळे सगळ्यांना कमी वयात जास्त पैसे मिळू लागले होते.
पण या सर्वात कुठेतरी चुकल्यासारखं वाटत होतं, काहीतरी हरवल होत. मन:शांती, सुकून, स्वत्व....!!
असोका मधला चंडअशोक आठवतो का? सगळ काही जिंकून अखेरीस विरक्त होतो.
स्वदेसचा मोहन भार्गव नासाची नोकरी सोडून चरणपुर गावात परत येतो.
"बाप का पैसा है, पडे पडे सड जाता है" म्हणणाऱ्या रंग दे बसंती मधल्या करणला अचानक एका क्षणी 'रूबरु रोशनी'चा साक्षात्कार होतो. अंगावर पोलिसांच्या लाठ्याकाठ्या पडताना सुद्धा हाताच्या मुठी आवळून बसून राहतो.
3 इडियट्समधला फुंसुक 'मै कहा गई और तुम कहा रह गई', ह्या चतुरच्या डिवचण्याला दाद न देता लद्दाखमध्ये लहानग्या मुलांची शाळा चालवतो.
टॅक्सी नं 9211 मध्ये एक टॅक्सी चालक तर दुसरा बिझनेसमनचा वाया गेलेला मुलगा तरी 'आझमाले आझमाले' म्हणत स्वतःच्या मनाच्या तळाशी डोकावून बघतात.
रॉकस्टारचा जनार्दन जाखड हा जॉर्डन झाला तरी स्वतःला 'ओ नादान परिंदे घर आजा' म्हणतो, तर दुसरीकडे रणबीरच्याच रुपात 'मेरे रुहका परिंदा फडफडाए, लेकिन सुकूनका जजीरा मिल ना पाए' म्हणतो.
आयुष्य त्याला समझावत की 'रे कबिरा मान जा, रे फकिरा मान जा' !! पण परतत असताना पायातल्या बेड्या अडवत असतात.
कधी 'वेक अप सिद' म्हणत स्वतःला उठवतो, तर कधी 'रॉकेटसिंग' बनुन पोरसप्रमाणे सिकंदरला भिडू पाहतो.
आदित्य कश्यप बनुन मिटिंगमधून बाहेर आल्यावर गिटार घेऊन वाजवू लागतो, तर कधी अर्जुन सलुजाप्रमाणे 'पिघले नीलम सा बहता हुवा यह समा' म्हणत निशब्द बसून राहतो.
किती नावे घ्यावी?? ही दोन दशकांची समरी आहे. सर्व मिळतंय आम्हाला पण या जगाच्या रहाटघाडग्यात तरी आम्ही एकाकी आहोत.
केवळ नायकच नाही तर नायिका सुद्धा स्वतःला म्हणतात "तु खुदकी खोजमे निकल तु किस लिए हताश है, तु चल तेरे वजुदकी समयकोभि तलाश है"
हा स्वतःचा शोध आहे ! एका तरुणाईचा !
एका पुर्ण सिनेयुगाचा !
-- सौरभ रत्नपारखी
#CinemaGully
Comments