चित्रपट
'चित्रपट बनवणे' ही जशी एक कला आहे, तशीच 'चित्रपट पाहणे' ही पण एक कला आहे. उदा. 'लगान'मध्ये मॅचच्या पहिल्या दिवशी कचराचा बॉल वळत नाही, पण दुसऱ्या दिवशी अचानक वळतो. हा सीन समझण्यासाठी निदान क्रिकेटच मुलभूत ज्ञान असावं लागतं तर खरी गंमत कळते.
'इकबाल'मध्ये नसिरुद्दीन शाह गंमतीत एक डायलॉग म्हणतो की "वक्तकी दिमकने आजभी मेरे बाजुओको कोखला नही किया"!! हा डायलॉग 'शोले'मधील संदर्भाला अनुसरून आहे, हे समझण्यासाठी तुम्ही कट्टर सिनेप्रेमी असणे आवश्यक आहे.
सिनेमा पहावा तर थिएटरमध्येच ! या सनातनी विचारांचा मी आहे. घरातला LCD कितीही इंची स्क्रीनचा असो तो सिनेमाचा खरा आनंद देऊ शकत नाही. नाहीतर 'खिलाडी'मध्ये आयेशा झुल्का जीव खात सर्व हॉस्टेलमध्ये पळत आहे आणि खुनी कोण हे रहस्य उलगडणार तोच 'मॅगी नूडल्स' किंवा 'उजाला सफेदी'ची जाहिरात लागणे हा त्या कलेचा अवमान आहे असे मी मानतो.
एकदा घरात टीव्हीवर 'गुप्त'चालू होता, तोच काकु येऊन म्हणाल्या "हा तोच पिक्चर आहेना रे ज्यात शेवटी कळत की .......च खुनी आहे?" (माझी नजरही आग ओकू शकते हे त्या दिवशी घरच्यांना कळाल)
तर सिनेमा पहावा तर तो थिएटरमध्येच!! मी अनेकदा पिक्चरपेक्षा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघणे पसंत करतो.
'जो जिता वोही सिकंदर" मध्ये मामिक सिंग जोरात ओरडतो "संजू !! टॉप गियर"त्या सरशी सर्व थिएटर उभं राहताना पाहिलं होतं.
'माहेरची साडी' पाहताना डोळे पुसणारे आपले कुटूंबीय अनेकांनी पाहिलं असेल पण माझ्या कुटूंबियांना मी सर्वच चित्रपट एन्जॉय करताना पाहिलंय.
लहान बहीण "चाची 420" मधील चाचीची फायटिंग पाहताना स्वतः हातवारे करत "मार त्याला मार" म्हणताना पाहिली होती, तर 'नटरंग' मध्ये गुणा कागलकरचा होणारी परवड पाहून सर्वजण सुन्न झाले होते.
एकदा "ऑल द बेस्ट"बघायला गेलो तेव्हा "धोंडू ! जस्ट चिल" या संजय मिश्राच्या पालूपदावर एकजण इतका जोरात हसायचा की सगळं थिएटर त्याच्याकडे वळुन बघत होत.
अजय देवगणच्या 'दिवानगी'मध्ये अजयबाबू हिरॉईनच्या मैत्रिणीला अचानक खाडकन कानाखाली वाजवतो त्या दृश्याला तिच्यापेक्षा गगनभेदी किंकाळी मागच्या रांगेतल्या एका कॉलेजकन्येने मारली होती की ती ऐकून क्षणभर आम्हीच धडधडलो होतो.
'सिंघम रिटर्न' मध्ये एका सीनमध्ये फाईट चालू असताना खलनायक दरवाजा बंद करून घेतो तेव्हा सिंघम इन्स्पेक्टर दयाकडे वळून फक्त बघतो त्या सीनला अख्ख थिएटर "दया !! तोडदो दरवाजा" म्हणत ओरडल तेव्हा पडद्यावर व्यापून उरलेल्या दयाच्या त्या एका सीनने पैसे वसूल करून दिले.
टाळ्या, शिट्ट्या, जल्लोष !!
चित्रपट पहावा तर अशा जिंदादिल लोकांसोबत नाहीतर 'इंटरस्टेलर' मध्ये डॉकिंगचा सीन मी श्वास रोखून पाहताना शेजारचा गडी घोरत होता तेव्हा त्याला लाथ मारून हकलण्याची इच्छा झाली होती.
'तारे जमिन पर'च्या क्लायमॅक्सला डोळे पुसणारे,
'घातक'च्या सनीपाजीच्या एकेक डायलॉगला शिट्टी मारणारे,
'सुलतान' पाहताना 'रे सुलतान ! कर दे चढाई' म्हणणारे,
'सैराट'मध्ये 'झिंग झिंग झिंगाट'गाणं लागताच नाचणारे,
'हेराफेरी'त बाबूभैय्याच्या अंधाधुंद फायरिंगला पोट धरून हसणारे…!!!
हे खरे सिनेरसिक !! आयुष्य जगावं तर ह्या लोकांनी !!!
चित्रपटगृहाच्या मिट्ट काळोखात, बाटल्यांच्या ओपनर्सच्या आवाजात, आणि तळलेल्या पाववड्यांच्या वासात ज्यांना स्वतःचे दुःख-दैन्य विसरून पडद्यावरच्या कथानकाशी एकरूप होता आले तेच खरे जीवनाचा आनंद घेऊ शकतात हे माझे ठाम मत आहे.
#CinemaGully
Comments