अदालत की कारवाई
अदालत की कारवाई
'शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये' असं म्हणतात, या वाक्याशी मी खुप सहमत आहे. कारण कोर्टात गेल्यानंतर आपला जो अपेक्षाभंग होतो तो आपण वेड्यात निघालोय अशी खात्री करून देणारा असतो.
आता ह्याचा संबंध कोणत्याही खटल्याशी नसुन बॉलिवूडशी आहे.
सर्वसाधारण भारतीयाला लहानपणापासुन कायद्याच शिक्षण मिळत ते बॉलिवूडच्या सिनेमातून, बाकी त्याचा आणि 'बार'चा संबंध कधी येत नाही (इथे 'बार' म्हणजे वकिलांच बार, तुम्हाला अपेक्षित असलेला बार नाही).
सिनेमे पाहून पाहून दफा 302, दफा 420 म्हणजे काय हे एव्हाना कळू लागलंय तरी काही प्रश्न अनुत्तरित राहिलेत.
'सच्चा-झूटा' सिनेमात जशी कुत्र्याने भुंकून साक्ष दिली की खटल्याचा निकाल लागतो तस वास्तव आयुष्यात घडत का?
'दामिनी'मध्ये पुढची तारिख देणारा जज जो निकाल लगेच देतो तो मीनाक्षी शेषाद्रीचा डायलॉग ऐकून देतो, की सनी देओलच्या डरकाळीला घाबरून देतो?
'मेरी जंग'मध्ये अनिल कपूर जशी विषाची बाटली खोटी आहे हे दाखवण्यासाठी रिचवतो तस वास्तव आयुष्यात होत का?
'क्युकी मै झूट नही बोलता' मध्ये गोविंदा स्वतःला कोर्टात आग लावून घेतो तस खरच घडलं तर?
एखादयाला फाशी दिल्यावर शाईपेनची निब मोडणारे जजसाहब बॉलपेनने काय करत असतील?
बॉलिवूडच्या कोर्टाच कामकाज उर्दूतुन का चालत?? (ताजीरात ए हिंद, मद ए नजर, सजा ए बामशक्कत, कल तक लिए मुलतवी...इत्यादि)
कोर्टात बसलेला अचानक कोणीही मध्येच उठून किंचाळल्यावर जज त्याला 'आपको जो भि कहना है कटघरेमे आकर कहो' म्हणत साक्ष ऐकल्यावर लगेच डिसीजन बदलतो का? आणि एवढी झटपट यंत्रणा असते तर मग इतकी वर्षे खटले प्रलंबित का राहतात.
जजच्या मागे हातात दंड धरून उभ्या असलेल्या व्यक्तीला सेम एक्स्प्रेशन खटला पुर्ण होईस्तोवर ठेवणे बंधनकारक असते का?
माझ्या आयुष्यात कोर्टात जाण्याचा प्रसंग एकदाच आला तोही एका अपघातासंदर्भात साक्ष द्यायला, पण तिथे ना 'कानून की देवी' होती, ना शपथ घ्यायला कोणी गीता समोर आणली, ना जजच्या टेबलवर हातोडा दिसला !! तिथला कटघरा पण 'हाय काय अन नाय काय' असा होता.
दारुण अपेक्षाभंगाच ओझं घेऊन कोर्टातुन जड पाय उचलत बाहेर आलो, मनात आपण इतकी वर्षे गंडवले गेलो हीच भावना होती, "मिलॉर्ड ! यह अदालतकी तौहीन नही बलकी मेरे मासुम सवालात है'
सौरभ रत्नपारखी
#CinemaGully
Comments