जिंदगी मिलेगी ना दोबारा
"जिंदगी ना मिलेगी दोबारा" - एक संस्मरणीय रोड ट्रिप
'फरहान अख्तर आणि झोया अख्तर' ही बॉलीवूडमधील जशी दोन भावंडे आहेत तसे त्यांनी दिग्दर्शीत केलेले 'दिलं चाहता है' आणि 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हे सिनेमे पण भावंडे आहेत.
तीनं तऱ्हेचे तीन मित्र आणि त्यांच्या तीन वाटा, ह्या थीमवर दोन्ही सिनेमे उभे राहिलेत तरीही दोन्हीकडच्या कथावस्तू वेगवेगळ्या होत्या.
कबीर (अभय देओल) , अर्जुन (ऋतिक रोशन) आणि इम्रान (फरहान अख्तर) ह्या तिघांची ही कथा !!
कबीरच लवकरच नताशाशी (कल्की कोएलचीन) लग्न होणार आहे. पण लग्नाआधी त्याला आपल्या जुन्या मित्रांसोबत 'बॅचलर रोड ट्रिप'वर जायच आहे.
बर, ही ट्रिप साधीसुधी नसुन युरोपात स्पेनला काढायची आहे व त्यातही गंमत म्हणजे तिघांनी ठरवलेल्या एकेक एडव्हेंचर स्पोर्टमध्ये इतर प्रत्येकाने सहभागी व्हायच आहे. ही आखणी त्यांनी फार पुर्वी केलेली असते पण मधल्या काळात तिघांच्या वाटा वेगवेगळ्या झालेल्या असतात.
अखेर ही ट्रिप सुरू होते. सतत कामात दंगलेला अर्जुन, खट्याळ अन मिश्किल स्वभावाचा इम्रान आणि आपल्या भावी पत्नीच्या दडपणाखाली असलेला कबीर अशा ह्या जिगरी दोस्तांची धमाल सफर सुरू होते खरी पण तिचा शेवट स्वतःचाच नव्याने शोध लागण्यात होतो.
कबिरने ठरवलेले 'अंडरवॉटर डायव्हिंग',
अर्जुनने ठरवलेले, 'स्काय डायव्हिंग', आणि इम्रानचे 'रनिंग ऑफ द बुल्स' हे तिन्ही धाडसी खेळ त्यांना आत्मपरीक्षण करायला लावतात.
समुद्राच्या तळाशी उलगडलेले स्वतःच अंतरंग, आकाशातून विहरताना बंधनांच मुक्त होणे, बैलांच्या शर्यतीतील स्वतःच्या भीतीवर ताबा मिळवणे....!! हे तिन्ही क्षण त्यांचा जणु पुनर्जन्म घडवून आणतात.
ह्यात नसिरुद्दीन शाह, कॅटरिना कैफ इत्यादींचे देखिल छोटे पण महत्वपुर्ण रोल आहेत.
फरहान अखतरच्या कवितांचा जागोजागी सूचक व सुंदर वापर केला आहे. शंकर-एहसान-लॉयच संगीत देखिल त्यांच्या नावाला साजेस आहे.
ह्या चित्रपटाच्या तांत्रिक बाजूंचा उल्लेखही आवर्जुन करावा लागेल. कॅमेरा हाताळणी, ड्रेस डिझाइनिंग, कास्टिंग, व्हर्जिन लोकेशनस, सर्वच बाबतीत पैकीच्या पैकी मार्क्स द्यावे असे प्रत्येकाचे काम आहे.
अगदी फरहानच्या बॅगवती पासुन हृतिकच्या पिंक मोबाईलपर्यत सुंदर डिटेलीग आहे.
केवळ स्पेनच सौदर्य किंवा हॉटेलच इंटेरिअर पाहण्यासाठी पुन्हा पहावा असा सिनेमा आहे.
झोया आणि रिमा कागदी ह्यांची स्क्रिप्टवरची घट्ट पकड जागोजागी दिसून येते.
'पिघले नीलमसा बहता हुवा यह समा' हे पार्श्वभूमीवर ऐकू येत असतानाची निशब्द शांतता आणि हृतिकच्या डोळ्यात नकळत आलेले अश्रु, हा सीन जेवढा मनाला स्पर्शून जातो तेवढेच फरहानच्या अंतरीचा सल मनाला भावतो.
'जब जब दर्द का बादल छाया' म्हणत असताना क्षितिजावर दिसणाऱ्या मावळतीच्या छटा त्याच्या अभिनयातही दिसून येतात. आपल्या जन्मदात्याने इतक्या कोरडेपणाने आपली जबाबदारी झटकली हे पाहून त्याच्या हृदयात आलेली कळ जेव्हा त्याला अर्जुनला 'सॉरी' म्हणायला भाग पाडते तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला जाणीव होते की मन दुखावणे काय असते ते....!!!
संभ्रमित आयुष्यात मित्रच खरे तारणहार असतात हे अप्रत्यक्ष जाणणारा कबीर देखील अभय देओलने मस्त साकारलाय.
'दिलोमे अपनी बेताबिया लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम' हे म्हणत असताना ज्या वळणावर हा सिनेमा संपतो तेव्हा आपल्यालाही वाटत की ही ट्रिप कधीच संपू नये.
सौरभ रत्नपारखी
#CinemaGully
Comments