मी पाहिलेले सिनेमे
"गॅंग ऑफ वासिपुर" सिनेमातला रामाधिर एका प्रसंगात वैतागून म्हणतो की "साला जबतक हिंदुस्थानमे सनिमा है, लोग #&@#& बनते रहेंगे !"
आजकाल म्युजिकली, टिक टॉक वरचे व्हिडिओ बघून रामाधिरच्या म्हणण्यात तथ्य होत हेच दिसून येत.
खरतर सिनेमा बनवणे ही खूप सुंदर कला आहे, एकाअर्थी अनेक कलांचा समुच्चय आहे. या कलेच्या प्रेमापायी आयुष्यातला एक मोठा कालखंड अजिबोगरिब सिनेमे पाहण्यात घालवला.
आरती छाब्रिया, किम शर्मा, पायल रोहतगी, सोनल चौहान, शमिता शेट्टी, सायली भगत इत्यादी नावाच्या नायिका पडद्यावर वावरत होत्या तेव्हाचा तो काळ होता. ह्यांच्या जोडीला अभिनेते म्हणून जॅकी भगनानी, आर्य बब्बर, नकुल कपुर, हरमन बावेजा वैगेरे नरपुंगव प्रति-हृतिक बनण्यासाठी बॉलिवुडात आले होते. पण दरम्यान हृतिकच्या मागेच पनवती लागल्यावर ह्यांना कोण विचारणार ?!
"Darling" नावाचा एक भुतपट ज्यामध्ये फरदिन खान - ईशा देओल जोडी होती हा सिनेमा मल्टिप्लेक्स मध्ये पाहण्याईतक मनाचं मोठेपण माझ्यात होत.
दुसऱ्या एका "हिरोज" नावाच्या सिनेमात सोहेल खान - वत्सल सेठ हे नायक होते. चांगल्या कथेची माती कशी होते हे 'ह्याची देही ह्याची डोळा' पाहिलं.
दरम्यानच्या काळात काही चायनीज कराटे छाप सिनेमे पण पाहिले, पण परमेश्वराने सर्व चायनीज बांधव कॉपी पेस्ट वापरून तयार केल्याने हिरो कोण? खलनायक कोण? हेच कळत नव्हत.
अरनॉल्ड शिवाजीनगरच्या (मूळ आडनाव टाईप करताना कीबोर्ड पण दमला) टर्मिनेटर चा कोणता तरी भाग पाहिला होता, मुळात हा पहिलवान गडी ! ह्याचा आणि अभिनयाचा काहीच सबंध नाही,पण रोबोटचा रोल असल्याने वास्तववादी अभिनय पहायला भेटला.
सलमानच्या "यह है जलवा"साठी तब्बल ३० मित्र लेक्चर बंक करून रांगेत बसले होते. तो मानसिक दबावापोटी पाहिला.
अभिषेक बच्चन अभिनित सिनेमे पाहिले की विद्यार्थी फेल होतो, ही अफवा इतकी पसरली होती की युवा पाहिल्यानंतर, गुरु, रावण, धूम ३ असा त्याचा एकही चित्रपट पाहिला नाही.
दादासाहेब फाळके ह्यांनी आपल्या शहरातून सिनेमाची स्वप्न पाहिली ह्याचा इतका पगडा मनावर होता की जणू ही इंडस्ट्री टिकवायची शपथ म्हणून हे सिनेमे पाहत होतो अस वाटत.
हे सगळ वाचत असताना माझ्या अभिरूचीवर प्रश्नचिन्ह उभे राहतील ह्याची कल्पना आहे. म्हणून सांगतो की आक्रित, वास्तुपुरुष सारखे फेस्टीव्हल मधले चित्रपट पण आवर्जुन पाहिले.
पायरेट्स ऑफ कॅरिबियन, मिशन इम्पॉसिबल, हॅरी पॉटर, MIB, वोल्वरिन ह्यांचा आगापिछा ठावूक नसताना विचारत विचारत बघण्यात पण मजा होती.
इंटरस्टेलर, इन्सेपशन सारखे चित्रपट तर खास मल्टिप्लेक्समध्ये रिकलायनर चेयरवर पाहिले. (त्या ख्रिस्तोफर नोलानने चित्रपट अजुन लांबवला असता तर तिथेच आडवा होण्याचा विचार होता.)
असो, गोदार्द नावाचा प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक म्हणतो की 'Cinema is the most beautiful fraud in the world'
ही फसवणूक खरच सुंदर होती.!!! आज हे आठवताना त्याच्या जोडीला आठवणी देखील तितक्याच सुंदर आहेत.
कधी शेजारच्या खुर्चीवर बसलेला एखादा प्रेक्षक साध्या विनोदावर पण पोट धरून हसायचा, हिरोच्या एन्ट्री होताच शिट्टी वाजवायचा, एखादी कन्या जोरात ओरडून उठायची "मार उसको मार" हे सगळ धमाल होत.
आता लोक बऱ्यापैकी रुळले आहेत, पूर्वीप्रमाणे मन लावून पाहणारे कमी झाले आहेत. पण तरीदेखील "पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त"!!!
©सौरभ रत्नपारखी
Comments