गुरू (2007)

गुरू (2007) कदाचित मी चुकत असेल पण राहुल द्रविड आणि अभिषेक बच्चन ह्यांच्यात मला फार साम्य वाटत. दोघांचेही पदार्पण दुसऱ्या स्टार परफॉर्मरपुढे झाकोळल गेलं (सौरभ गांगुली आणि ऋतिक रोशन) ! द्रविड जसा कारकिर्दभर दबावाखाली खेळी खेळत राहिला तसा कर्तृत्ववान आई-बाप आणि पत्नी ह्यांच्या कर्तृत्वाच्या दबावाखाली अभिषेकही ट्रोल होत राहिला. एक्शन, कॉमेडी, रोमँटिक, गॅंगस्टरपट करूनही त्याला हवा तो ड्यु मिळाला नाही जस द्रविडच झालं. तरी द्रविडच्या काही खेळी जशा गाजल्या तशा युवा, गुरू, रावण, सरकार मधला त्याचा अभिनय निश्चितच वाखाणण्याजागा होता. 2007 च्या मनिरत्नम दिग्दर्शीत 'गुरू'ने खऱ्या अर्थाने त्याच्यातल्या अभिनेत्याला न्याय दिला. ह्या सिनेमाच कथानक खुपस धीरूभाई अंबानींच्या आयुष्यावर बेतलेल.!! गुजरातच्या एका छोट्या खेड्यातील तरुण गुरुकांत देसाई (अभिषेक बच्चन) आयुष्यात यशस्वी होण्याच स्वप्न पाहतो पण त्याचे शिक्षकीपेशातील मध्यमवर्गीय वडिल (राजेंद्र गुप्ता) त्याला वास्तवात न येणारी स्वप्ने न पाहण्याचा सल्ला देतात. पण गुरू महत्वाकांक्षी असतो टर्कीमध्ये नोकरीला गेलेला गुरू मोठा व्यावसायिक होण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत येतो. दरम्यान सुजाता (ऐश्वर्या राय) सोबत त्याच लग्न झालेले असत. लग्नातला हुंडा हेच त्याच भांडवल असत. आपल्या मेहुण्याला (आर्य बब्बर)ला सोबत घेऊन तो शक्ती कॉर्पोरेशनची स्थापना करतो. ह्या धडपड्या आणि होतकरू तरुणाची कष्ट करण्याची प्रवृत्ती पाहून माणिक (नानाजी) दासगुप्ता (मिथुन चक्रवर्ती) हे 'स्वतंत्र' नावाच्या वृत्तपत्राचे संपादक त्याला सुरुवातीच्या काळात मदत करतात. पण हळूहळू गुरूच्या महत्वाकांक्षी वृत्तीला खतपाणी मिळत जाते, शक्ती कॉर्पोरेशनला देशातली पहिल्या क्रमांकाची कंपनी बनवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद वापरून तो आगेकूच करतो. त्यासाठी कायदेकानुन/कर/नीतीनियम कशाचीही भीडभाड बाळगत नाही. राजकारणी, नोकरशहा, प्रतिस्पर्धी सर्वाना जेरीस आणत गुरुची घोडदौड सुरू होते. अखेर त्याच्या आसुरी महत्वाकांक्षेला नानाजीच पायबंद घालायचे ठरवतात. आपल्या वृत्तपत्रातील निर्भीड पत्रकार श्याम सक्सेनाला (आर.माधवन) त्याच्या काळ्या कारनाम्यांची पोलखोल करण्यास सांगतात....!! गुरूच्या ह्या स्वप्नाचा प्रवास कशी वळणे घेतो यासाठी सिनेमा पाहणेच उत्तम !! ह्या सिनेमात विद्या बालनने देखिल एक छोटी पण महत्वाची भूमिका बजावली आहे. ए.आर.रहमानच हातखंडा म्युजिक, सर्वांचा सुंदर अभिनय, आणि मनिरत्नमच दमदार दिगदर्शन यामुळे गुरूची भट्टी छान जमली होती. हात लुळा पडलेला गुरुभाई ही खास अवॉर्ड विनिंग ट्रिकपण बेमालूम एड केलेली. हा सिनेमा धीरुभाई अंबानींचा बायोपिक समजला जातो यामागे अनेक कारणे आहे. कथानायकाची गुजराती पार्श्वभूमी, आखातातील नोकरीचा संदर्भ, पॉलिस्टर निर्मिती, राजकीय नेत्यांशी संबंध अशी खूप साम्यस्थळे आहेत. मिथुन आणि माधवनचे पात्रही अनुक्रमे इंडियन एक्स्प्रेसच्या रामनाथ गोएका आणि स्वामिनाथन कृष्णमूर्ती ह्यांच्यावर आधारित असल्याचं सांगण्यात येते. गुरूभाईची कंपनी विकत घेऊ पाहणारा पारशी उद्योजक कोण ह्याची कल्पना करता येईल. गुरू पहावा तर त्याच्या पाच मिनिटांच्या क्लायमॅक्सच्या भाषणासाठी !! शाहरुखच्या सत्तर मिनिटं भाषणाइतकीच सुंदर अदाकारी अभिषेकने केली आहे. जगातली नंबर एक कंपनी बनण्याचं स्वप्न पाहत होणारा चित्रपटाचा शेवट जो आशावाद दाखवतो तो मात्र नक्कीच गुरूच्या काळ्या ढगांच्या साम्राज्याची एक रुपेरी किनार ठरतो. -- सौरभ रत्नपारखी #CinemaGully

Comments

Popular posts from this blog

मंगरुळ तें वॉशिंग्टन

तुघलक

ताजमहल