10 Years Challenge

सध्या फेसबुकवर 10 years challengeचा trend सुरू आहे. असा एखादा trend आला की माझ्यासारख्या Nostalgia मध्ये जगणाऱ्यांना उधाण येत. खरतर हा trend फेसबुकवर वेगळ्या स्वरूपात चालूच होता. कधी ‘If you remember this’ तर कधी ‘Only 90’s kids will know this’ च्या रूपाने ते समोर येतच होत. दरदिवशी ‘On this day' च नोटिफिकेशन पण झळकत असत. या ओघात एकदा मी #तिशीपारचे_आम्ही ही पोस्ट पण लिहिली. दहा वर्षे हा फार मोठा काळ असतो. २००७ च्या सुमारास अमेरिकेत आर्थिक मंदी सुरू झाली होती. 9/11ला वर्ल्ड ट्रेड सेंटर कोसळल्यानंतर अमेरिकेने जी आर्थिक धोरणे राबवली. त्यांचे दुष्परिणाम दिसू लागले होते. कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर cost cutting केली. रोजगाराच्या फार संधी हिरावल्या गेल्या. २००७ नंतर रोजगाराची स्पर्धा तीव्र होत गेली. सरकारने भरमसाठ इंजिनियरिंग कॉलेजेसला मान्यता दिल्या पण त्या प्रमाणात कंपन्या तयार न झाल्याने मिळेल त्या नोकरीत आणि पगारात इंजिनियर्स काम करू लागले. एकूणच त्या सर्व अभ्यासक्रमाचेच अवमूल्यन झाले. शालांत परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थी आत्महत्या करतात म्हणून खिरापतीसारखे गुणवाटप सुरू झाले. नववीपर्यत ढकलगाडी सुरू झाली. ज्यांना आकडेमोड नीट जमत नाही त्यांना इंजिनियरिंगची स्वप्ने पडू लागली. मधल्या काळात मराठीच्या मुद्द्यावर नोकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. मग भाषिक वादाचे लोण थोड्याफार प्रमाणात सर्वच राज्यात पसरले. स्थानिक विरुद्ध परप्रांतीय हा संघर्ष वाढत गेला इतका की इंग्लड, ऑस्ट्रेलियातपण भारतीय वंशाच्या लोकांवर हल्ले सूरु झाले. स्थानिकांच्या, भाषिकांच्या नोकऱ्या कमी की काय म्हणून पटेल, जाट, गुर्जर, पासून मराठा, धनगर आरक्षण पर्यत हे लोण पसरत गेलं. केबीसी, इंडियन आयडॉलसारख्या कार्यक्रमानी पैशाचे सुद्धा अवमूल्यन करून टाकलं. आयपीएलने तर पैशामुळे “देश महत्वाचा की क्लब?” असे वातावरण तयार केले. एकता कपूर छाप मालिकांनी नातेसंबंध विस्कळीत करून टाकले. नियमांच्या चौकटीत वागणाऱ्या दूरदर्शनवर शेवटची मालिका कधी पाहिली आठवाव लागत. कालपरवा पर्यंत कोणाच्याच खिजगणतीतही नसणारे लोक टेलेंट शोमुळे ‘स्टार्स आणि सेलेब्रिटी’ होऊ लागले. व्हाट्सएप/फेसबुकने जगण्याच्या चौकटी बदलवल्या. आई, वडील, शिक्षक, बॉस सर्व एका क्लिकवर ‘फ्रेंड’ या नात्याने ‘रिक्वेस्ट’ पाठवू लागले. हे परस्परांमधील अंतर कमी होणे हा फार सूक्ष्म पण महत्वाचा बदल होता. निष्ठा, आदर, धाक, ह्यांच्या व्याख्या बदलाव्या लागल्या. काल परवा जन्मलेले पोर कॉपी,पेस्ट,फॉरवर्डच्या जोरावर कोणत्याही महापुरुषावर शिंतोडे उडवू लागला. २००१ नंतर जन्मलेली पिढी ह्या माहितीच्या मोठ्या प्रवाहात वाहत फार पुढे निघुन गेली. कधी जमल्यास यु ट्यूबवर गेल्या दशकात गाजलेल्या गाण्यांच्या व्हिडीओखाली असणाऱ्या कमेंट्स वाचा.आपण किती मोठा पल्ला गाठला आहे हे लक्षात येईल. हे सर्व आपल्या आजूबाजूला घडत होतं. हे होत असताना मित्रांचे status ‘Got engaged /Got married’ कडुन ‘first day of school/ my little angel’ वर कधी पोहोचले कळलंच नाही. ©सौरभ रत्नपारखी

Comments

Popular posts from this blog

मंगरुळ तें वॉशिंग्टन

तुघलक

ताजमहल