सिंगलता

'काही लोक इतके सिंगल असतात की........!!!!' असा विनोद असलेले मेसेज मी शक्यतो फॉरवर्ड करीत नाही.

कारण व्हाट्सअप पसरलेल्या ग्रुप्सच्या जाळ्यात अनेक मित्र सिंगल आहेत, पण हा विषय खरंच हसण्यावारी नेण्यासारखा आहे का?

कुंडलीदोष, प्रापंचिक अडचणी, निराधारता, फसवणूक या व इतर अनेक कारणातून आलेले एकाकीपण खुप वाईट असते.

अनाथ असल्यामुळे जाती-धर्माचा पता नसलेले किंवा काका-मामांच्यावर अवलंबून असलेले सुद्धा काहीजण आहेत.

कमी वयात जोडीदाराचा मृत्यू व त्यातून आलेले सिंगलपण तितकेच वाईट !

आपल्या लहान भावाबहिणींच्या लग्नाखातर किंवा देशसेवेसाठी आणि समाजकार्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून सिंगलत्व स्वीकारणारे पण खूप आहेत.

आपल्या अपंगत्वाचे ओझे कोणावरही येऊ नये म्हणून लग्न न करणारे देखील बरेच जण मित्रयादीत आहेत.

काहीजण यशस्वी शेतकरी किंवा दुकानदार पण आहेत तरी मुलीचे वडील शासकीय नोकरीला प्राधान्य देत आहेत.

नोकरी मिळत नसल्याने हताश झालेले व त्या आर्थिक स्थैर्याअभावी लग्न टाळणारे पण आहेत.

घरातीलच एखाद्या शुल्लक वादावरून जातीबाह्य केलेले कुटूंबीय याकाळात देखील आहेत.

कुटूंबात आनुवंशिक आजार असेल तर पुढच्या पिढीला तो नको म्हणणारे पण आहेत.

सिंगल असण्याच्या अनेक कथा असू शकतात. त्यामुळे असे मेसेज चेष्टेत पाठविताना समोरच्याची पार्श्वभूमी समजून घेणेही गरजेचे आहे. फेसबुक-व्हाट्सअप हे मानसिक दबाव निर्माण करणारे घटक झाले आहेत.
सातत्याने डोळ्यासमोर दिसणाऱ्या Got married, Got engaged, च्या पोस्टच्या मागे एखाद्या मित्राचा उदास चेहरासुद्धा दिसून येतो.

कारण सुखी संसार रंगविण्याचे बऱ्याच जणांच स्वप्न अद्याप स्वप्नच आहे.

©सौरभ रत्नपारखी

Comments

Popular posts from this blog

आजीबाईंचा सिनेमा

धन्यवाद साहेब

अदालत की कारवाई