इतिहास सिनेमॅटिक लिबर्टीचा (मुघल सल्तनत)

भाग 3 मुघल सल्तनत केवळ चित्रपट पाहून भारतीय इतिहासाचा नित्कर्ष काढायचा ठरला तर मुघल सल्तनत म्हणजे प्रेमवीर बादशाहांची परंपरा असलेला फॅमिली बिझनेस वाटेल. अनारकली, मुघल-ए-आझम, ताजमहल, जोधा-अकबर अशा विविध चित्रपटातून मुघल बादशाह मोठ्या पडद्यावर आपल्या समोर आले आहेत. तर बहादूरशाह जफर, भारत-एक-खोज, अकबर-दि-ग्रेट, द ग्रेट मराठा आदी मालिकातून छोट्या पडद्यावर पण त्यांच्या कथा दाखविण्यात आल्या आहेत. ह्यात सर्वात जास्त उल्लेखनीय नाव म्हणजे अभिनेत्यांचे पितामह पृथ्वीराज कपूर ह्यांनी साकारलेला 'जलालुद्दीन मुहम्मद अकबर !!' मुघल-ए-आझम सिनेमातला बुलंद आवाजाचा आणि धिप्पाड शरीरयष्टीचा अकबर त्यांनी असा काही रंगविला कि पुढची बरीच वर्षे अकबर साकारणाऱ्या इतर अभिनेत्यांनी सुद्धा त्यांचे अनुकरण करीत नाहक खर्जातला आवाज काढुन भूमिकेत दमदारपणा आणण्याचा प्रयत्न केला. किल्ल्याच्या तटावरून दमदार पाऊले टाकत चालणारा सिनेमातला हा अकबर पाहून खऱ्या अकबराला सुद्धा हेवा वाटला असता.
येथूनच सिनेमॅटिक लिबर्टीचा वाद सुरू होतो, कि अकबराची देहबोली नेमकी कशी होती??? अकबर असाच दिसत असायचा का? सलीम-अनारकलीच्या प्रेमाला विरोध करणारा अकबर खरा कि जोधाच्या प्रेमाखातर मौलवींचा राग ओढवणारा अकबर खरा? मग बिरबलाला 'बैलगाड्या मोजून ये' सांगणारा दंतकथेतला अकबर कोणता?? मुघल-ए-आझम किंवा इतर अनेक चित्रपटात अनारकलीचा सातत्याने उल्लेख येतो पण तिच्या सत्यतेेबाबत इतिहासकारात दुमत आहे. हीच गोष्ट उर्दू भाषेची !! भाषातज्ञांच्या मते अकबर इतकी अस्खलित उर्दू बोलत नसावा कारण ती भाषा बरीच अलीकडच्या काळात विकसित झाली. मुघलांच्या दरबारात सर्रास दाखविले जाणारे ठुमरी सारखे नृत्यप्रकारही नंतरच्या काळात प्रसिद्ध पावलेले. 'प्यार किया तो डरना क्या' म्हणत अनारकली जेव्हा अकबरासमोर दिमाखात नाचते तेव्हा अकबराच्या मनातील कश्मकश दाखविण्यासाठी शीशमहलचा सूचक वापर केला आहे. "चारो तरफ है उनका नजारा" या कडव्यात त्याला प्रत्येक काचेच्या तुकड्यात अनारकली दिसू लागते. कथानकाची गरज म्हणून हे दृश्य असले तरी ह्यावर एखादा स्थापत्यतज्ञ वाद घालेल कि ह्या प्रकारचें बांधकाम अकबराचा दरबारात होते की नव्हते. अनारकली प्रमाणेच ताजमहाल हे सुद्धा मुघलकालीन प्रेमाचे प्रतीक !! पण कलावंताच्या दृष्टीकोणातून त्या निर्जीव वास्तूचे सुद्धा किती विविधरंगी चित्रण व्हायचे हे पाहण्यासारखे आहे. शकील बदायुनी किंवा हसरत जयपुरी सारखे गीतकार ताजमहालावर प्रेमगीत लिहायचे तर साहिर लुधियानवी म्हणायचे "इक शहनशाहने दौलत का सहारा लेकरं, हम गरीबोके मोहोब्बतका उडाया है मजाक" हा त्या त्या गीतकारावर असलेल्या राजकीय विचारसरणीचा प्रभावं मानला जाई. मुघल बादशाह हे सुद्धा आपल्यासारखेच हाडामासांची माणस होते. त्यामुळे त्यांनी प्रेम करणे, नाचणं, विनोद करणे ह्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. "ख्वाजा मेरे ख्वाजा' म्हणत अकबर गिरक्या घेत नाचलाही असेल पण इतिहासात इतक्या बारीक घटनांचे संदर्भ सापडायचे तरी कसे?? इतिहास हा ताजमहालाप्रमाणे भव्य, बेरंगी आणि निर्जीव आहे. एखादा 3D सिनेमा पाहताना डोळ्यावर ज्या रंगाचा गॉगल घालाल त्या रंगात तो तुम्हाला दिसेल. गॉगल गुलाबी असेल तर ताज प्रेमाचे प्रतिक वाटेल, गॉगल भगवा असेल तर तुम्हाला तेजोमहालय दिसेल, गॉगल लाल असेल तर कारागिरांचे तुटलेले हात दिसेल, गॉगल हिरवा असेल तर इस्लामी स्थापत्याचे वैभव दिसेल, कोणत्या रंगाचा गॉगल घालून तुम्ही इतिहास वाचता हे तुमच्यावर अवलंबून आहे. (क्रमश:) सौरभ रत्नपारखी

Comments

Popular posts from this blog

मंगरुळ तें वॉशिंग्टन

तुघलक

ताजमहल