इतिहास सिनेमॅटिक लिबर्टीचा (रामायण-महाभारत)

भाग 4
रामायण आणि महाभारत हि दोन आर्ष महाकाव्ये निःसंशयपणे भारतीय संस्कृतीचे दोन आधारस्तंभ आहेत. भारतीय व्यक्ती, शहरे, नद्या, वास्तूंच्या नावातूनदेखील त्यांचे अस्तित्व आजही जिवंत आहे. त्यातील पात्रे व त्यांच्या आचरणाचा भारतीय समाजमनावरील परिणाम हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल. ह्या दोन्ही महाकाव्यांच्या लोकप्रियतेचा प्रत्यय 80 च्या दशकात प्रसारित झालेल्या दोन दूरदर्शन मालिकांच्या निमित्ताने आला होता. रामानंद सागर ह्यांची 'रामायण' आणि बी.आर.चोप्रा ह्यांचे 'महाभारत' ह्या मालिकांनी बनविलेले TRP चे विक्रम अपूर्व होते. त्या मालिकांच्या प्रसारणादरम्यान रस्त्यांवर अघोषित संचारबंदी जाणवायची, लहान मुले युद्धाचे अनुकरण करीत असताना जखमी झाल्याच्या बातम्या यायच्या, अंत्यविधी सुद्धा थांबविले जात असे, टीव्ही समोर अगरबत्ती लावून मालिका पाहिली जाई. त्या काळात वाहिन्यांचा इतका महापूर नव्हता. डेली सोपं हि कल्पना त्याकाळी नव्हती किबहुना दूरदर्शनच्या सरकारी नियमात एपिसोड्सचे बंधन असल्याने अनेक उपकथा गाळाव्या लागल्या होत्या. इथूनच सिनेमॅटिक लिबर्टीचा वाद सुरू होतो. कारण पुढे अनेकांनी डेली सोपच्या आणि TRP च्या नावाखाली ह्या दोन्ही महाकाव्यांचे मनोवांच्छित चित्रण करत नाहक एपिसोड्सची संख्या वाढवत नेली. मुळात दोन्ही महाकाव्ये हजारो वर्षापूर्वीची असल्याने त्यात अनेक प्रक्षिप्त कथा कालपरत्वे घुसडल्या गेल्या आहेत. 350 वर्षांपूर्वीच्या शिवचरित्रातवरच इथे एकमत होत नाही तेव्हा हजारो वर्षांची कल्पना करणेपण अवघड आहे. रामायण-महाभारत सत्य कि केवळ काव्य हा न संपणारा वाद आहे त्यामुळे त्या वादात न पडता केवळ महाकाव्य जरी समझले तरी तुलसी रामायण, वाल्मिकी रामायण, उत्तर रामायण, कदंब रामायण असे अनेक प्रकारचे रामायण जगभर सागितले जाते. तीच कथा महाभारताची ! महाभारताची व्याप्ती तशी रामायणापेक्षा मोठी असल्याने प्रक्षिप्त कथा खूप मोठ्या प्रमाणात आहे. उदा. महारथी कर्णला अभेद्य कवच-कुंडल लाभले होते तर एखादा भुंगा त्याच्या मांडीतून पोखरत आत जाईल का??? कौरव-पांडव सोन्याचे मुकुट व दागिने घालून लढले असतील का?? दुर्योधनाच्या अभेद्य शरीराची कथा मूळ महाभारतात आहे का?? रामायणातील वानर सेना महाभारतीय युद्धात लढताना मालिकेत का दाखवले गेले नाही??? गोंधळ वाढावा असे बरेच प्रश्न आहे. गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधली नसती तर धृतराष्ट्राची अजून चांगली साथ दिली असती व आंधळ्याची काठी बनून राहिली नसती का?? द्रोपदी सारख्या राजकन्येने आपल्या चुलत सासऱ्याच्या संदर्भात 'अंधाचा पुत्रही अंधच' असे दुर्योधनाला म्हटले असेल का??? असे प्रश्न अनेक उपप्रश्न निर्माण करतात पण दोन्ही महाकाव्यांच्या मुळाशी जाण्यासाठी दुसरा पर्याय नाही. लोकांना युद्धाचे प्रसंग पहायला आवडतात म्हणून चमत्कारिक शरसंधान दाखविणे किंवा कौरव पांडव सिक्स पॅक मध्ये दाखविणे हे सर्व सिनेमॅटिक लिबर्टीच म्हणता येईल. आज ह्या दोन्ही महाकाव्यांची स्थिती एखाद्या विशाल महासागरासारखी झाली आहे. देशोदेशीच्या कथा-दंतकथानी दोघांनाहि समृद्ध केले आहे. त्यातून मूळ कथा शोधणे अशक्यप्राय झाले आहे तथापि 'हे ज्ञान कि यह गंगा, ऋषीयोकी अमरवाणी' म्हणत पिढ्या न पिढ्या ऐकवली जात आहे आणि "जाकी रही भावना जैसी प्रभू मुरत तेन देखी तैसी" म्हणत पडद्यावर झळकत आहे. @सौरभ रत्नपारखी (क्रमश:)

Comments

Popular posts from this blog

आजीबाईंचा सिनेमा

धन्यवाद साहेब

अदालत की कारवाई