इतिहास सिनेमॅटिक लिबर्टीचा (बायोपिक्स आणि सत्यघटना)
भाग 5 बायोपिक्स आणि सत्यघटना
'Cinema is the most beautiful fraud in the world'
प्रख्यात आंतरराष्ट्रीय सिनेदिग्दर्शक गोदार्द ह्यांचं हे वाक्य खूप काही सांगून जाते.
सिनेमा हि एक सुंदर फसवणूक आहे.
अडीच तीन तास आपल्याला एका आभासी विश्वात घेऊन जातो आणि आपण स्वतःच अस्तित्व विसरून त्या त्या पात्राशी एकरूप होऊन हसतो, रडतो, किंवा गाऊ लागतो.
पण इतिहास म्हणजे फसवणूक नाही त्या शब्दाचा अर्थच ‘हे असं आहे’ असा रोखठोक ! त्यामुळे बायोपिक्स किंवा सत्यघटना पडद्यावर आणताना मसाला किती टाकावा हि एक अडचण बनते.
उदा. दादासाहेब फाळके हे जादूचे प्रयोग करायचे व त्या अनुषंगाने येणारी विनोदबुद्धी त्यांच्यात असावी असा तर्क आपण करू शकतो. पण त्यांना जवळून पाहणारे अनेक जण सांगतात की दादासाहेब कडक शिस्तीचे व तापट स्वभावाचे होते. तसेच उतारवयात आलेल्या आर्थिक चणचणीतून थोडे खचले होते असे उपलब्ध पत्रातून जाणवते परंतु ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ ह्या सिनेमातून विनोदाच्या अंगाने त्यांचे चित्रण केल्याने त्यांच्या चरित्राची ती गंभीर बाजू जाणवत नाही.
ह्या उलट गोष्ट ‘भाग मिल्खा भाग’ची ! मिल्खासिंग ह्यांचे ऑलिम्पिक पदक हुकले कारण त्यांना ‘फाळणीदरम्यानचा कुटुंबाच्या हत्याकांडाचा प्रसंग आठवला आणि ते शर्यत हरले’ असं सिनेमात दाखवलंय पण क्रीडातज्ञ व खुद्द मिल्खासिंग सांगतात की त्या शर्यतीत ते धावताना मागे वळून पाहण्याच्या नादात लय हरविल्याने हरले व विशेष असे कारण काही नव्हते.
‘बोस-द फरगोटन हिरो’ ह्या सिनेमाच्या शेवटी नाहक वाद नको म्हणून नेताजींच्या अपघाताचा प्रसंगच टाळण्यात आला व ह्यावर दिग्दर्शक श्याम बेनेगल ह्याचेकडून असे स्पष्टीकरण देण्यात आले की,’मला नेताजींच्या जीवनावर चित्रपट बनवायचा होता मृत्यूवर नाही.
इतिहासाचा अभ्यास करताना नाण्याच्या दोन्ही बाजू पाहणे आवश्यक आहे.
‘लालबाग-परळ’ हा सिनेमा 80 च्या दशकातिल मुंबईच्या गिरणी कामगारांच्या जीवनावर आधारित होता. संपामुळे त्यांची कशी दुर्दशा झाली व तरुण पिढी कशी गुन्हेगारीकडे वळली ह्याचे विदारक चित्रण सिनेमात केले आहे. तथापि एका गिरणी कामगाराने हा सिनेमा पाहून प्रतिक्रिया दिली की ह्यात बव्हंशी तथ्य असले तरी त्याकाळात शालांत परीक्षेच्या गुणवत्ता यादीत लालबाग-परळच्या विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली होती व ‘दादर-गोरेगावची’ संपन्न घरातील मूले मागे पडली होती कारण अनेक गिरणी कामगारांच्या मुलांनी दिवस रात्र अभ्यास करून स्वतःच्या घरची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केला होता. हि एक सकारात्मक बाजू आहे.
आज वाचन संस्कृती खालावत चालली आहे, दृकश्राव्य माध्यमातला इतिहास प्रमाण मानण्याचा प्रघात वाढत चालला आहे, त्यामुळे इतिहास लेखनाचे नियम इतिहास चित्रणाला लावण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा येणारी पिढी पडद्यावर जे दिसेल ते खरे मानून अर्धवट इतिहासच खरा मानेलं ह्यात शंका नाही.
Comments