रांगेतली ती

फार जुनी नाही अगदी अलीकडचीच गोष्ट. अलीकडची म्हणजे जेव्हा मोबाईल आणि माणुस दोघांना बटनांची गरज भासायची आणि दोघांतला फक्त मनुष्यप्राणीच स्मार्ट होता तेव्हाची ही गोष्ट ! त्यावेळी ऑनलाइन फॉर्म सबमिशनच फॅड फारस पसरल नव्हतं. अशाच कोणत्या तरी स्पर्धापरीक्षेच्या फॉर्म भरण्याची शेवटची तारिख म्हणून मी धावतपळत पोस्ट ऑफिस गाठलं होत. पोस्टऑफिसच्या एकूणच वातावरणात आनंदीआनंद होता. भल्या मोठ्या रांगेच्या काऊंटर पलीकडच्या गृहस्थाच्या चेहऱ्यावर ‘आजही आम्हाला भाव आहे’ असा गुर्मी वजा आनंद होता. ‘उशिरा फॉर्म भरणारे आपणच एकटे वेंधळे नाही,’ असा रांगेतल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानी खजिलपणा दिसत होता. बाजुलाच एक समजुतदार वाटणारा नवरा आपल्या भोळ्या वाटणाऱ्या बायकोला ‘साक्षांकन आणि छायांकन’ मधला बेसिक फरक सांगत होता. दुसऱ्या बाजुला एकजण गांधीबाबाच स्टॅम्प तिकीट पाकिटाला लावताना फाळणीचा राग स्टॅम्पवर दणके देत काढत होता. ‘मोफतमे मिले तो जहरभी पिले’ या भारतीयांच्या सवयीला अनुसरून पलीकडच्या टेबलवरील डिंकाची बाटली टेबलवर सांडून सांडून एकरूप झाली होती. अशा आनंददायी वातावरणात मी माझ्या हातातली कागदांची चळत सांभाळत रांगेत उभा होतो. तोच काऊंटरपल्याडच्या गृहस्थाने “एका रांगेत या!’ अशी सूचना वजा दरडावणी करताच, वेगळी रांग करून शॉर्टकट मारू पाहणारा महिलावर्ग मुकाट्याने पुरुषांच्या रांगेत एकजीव झाला. तो गृहस्थ मला खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानतेचा पाईक वाटला. माझ्या पुढे ‘ती’ हातात फॉर्म घेऊन उभी होती. खरतर ती पाठमोरी असल्याने चेहरा ओझरता दिसला पण तरी ओळखता येण्यासारखा होता. जवळपास दहा वर्षे झाले असतील. कॉलेजच्या दिवसात एका लोकप्रिय टीव्ही चॅनलने राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा भरवली होती तेव्हा ती प्रतिस्पर्धी कॉलेजतर्फे सहभागी झाली होती. टीव्ही चॅनेलचे ग्लॅमर असल्याने स्पर्धेला तुफान रिस्पॉन्स होता. जी एकांकिका जिंकेल त्यांच्या अभिनेत्या-अभिनेत्रींना चित्रपट-मालिकांच जग खुल होणार होत. सिनेजगत तिच्यासाठी एका विजयी पाऊलावर वाट बघत उभं होत. त्या अंतिम फेरीतील तिचा परफॉर्मन्स निव्वळ अफलातून होता. प्रेक्षकात बसलेला हजारो कॉलेजयुवकांचा हुल्लडबाजी करणारा मॉब तिच्या दोन तीन डायलॉग नंतर स्तब्ध होऊन बघत राहिला. कोणीतरी गारुढ केल्यासारख पाऊण तास सर्वजण बसून होते. ती एकांकिका आणि तिचा अभिनय फायनल मारणार हे सांगायला परिक्षकांची गरज पण उरली नव्हती. अजुन दोन-चार महिन्यात हिची टीव्ही मालिका दिसणार असे सर्वाना कळून चुकले होते इतका सर्वांगसुंदर अभिनय तिने केला होता. त्यानंतर आज थेट दहा वर्षांनी तिला पाहिलं ते इथे पोस्ट ऑफिसात. तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्यानंतर तिच्या नावाचा झालेला गजर अजुनही आठवत होता, म्हणून नकळत तिचे नाव पुटपुटलो आणि तिने चमकुन मागे वळुन पाहिले. तिने मला ओळखण्याचा प्रश्नच नव्हता कारण ही पहिलीच भेट होती. त्यामुळे तिच्या ‘Yes !?’ ला फक्त मी तिच्या एकांकिकेच नाव घेत म्हणालो,”त्यात तुच होतीस ना? तो परफॉर्मन्स आजही आठवतो” ‘वेदनेची कळ’ आणि ‘आनंदाचे हसू’ कधी एकत्र पाहिली का? तिच्या चेहऱ्यावर मला दोन्ही एकत्र दिसले होते. “ग्रेट ! तुला आजही आठवत?” ती खिन्नपणे हसत म्हणाली,”ते माझ्या आयुष्यातले गोल्डन डेज होते” तिच्या बोलण्यात एक अनामिक सल जाणवत होता. आमची फारशी ओळख नव्हती, पण त्यावेळीस सर्व संधी स्वतःहून चालत समोर आल्या असताना ती अचानक प्रसिद्धीच्या शिखरावरून नाहीशी झाली. तिच्या सोबतचे अभिनय क्षेत्रात नावारूपास आलेले पाहिले होते. पण हिच तेव्हा नाहीस होणं एक गुढ होत. आज बऱ्याच वर्षांनी समोर येऊनही विचारण्याच धाडस झालं नाही कारण फारशी ओळख नव्हती. तिच्या हातातली कागदपत्रांची फाईल पाहून तिने ह्या परीक्षेचा फॉर्म भरावा, अस मला मुळीच वाटत नव्हतं. एवढा अप्रतिम अभिनय करणाऱ्या अभिनेत्रीला 10 ते 5 सरकारी कामात खर्डेघाशी करताना कल्पना करणं, मला नियतीचा क्रूर विनोद वाटत होता. ती गुपचूपपणे फॉर्म भरून बाजुला झाली. कोणीतरी अनोळखी व्यक्ती इतक्या वर्षांनी आपली ओळख ठेवते ह्याच तिला खुप अप्रूप वाटलं होतं. तिने त्यावेळच्या काही आठवणी सांगितल्या. कोणाला कोणती सिरीयल मिळाली हेही सांगितलं. त्या सांगण्यात बाकीचे पुढे गेल्याची असुया नव्हती तर आपण मागे पडल्याचं दुःख होत. ‘अस का झालं?’ हे विचारण्याचं धाडस मला झालं नाही, कारण कदाचित वैयक्तिक आयुष्यातल्या काही अटळ घडामोडी असतील. पण जाताना ती आवर्जुन “थँक्स”म्हणाली आणि तिच शेवटचं वाक्य चुटपुट लावुन गेलं. “मला परत थिएटर करायचंय यार !” ©सौरभ रत्नपारखी

Comments

Popular posts from this blog

आजीबाईंचा सिनेमा

धन्यवाद साहेब

अदालत की कारवाई