मृत्युंजय
सहावीत असताना कधीतरी शिवाजी सावंत लिखित 'मृत्युंजय' कादंबरी वाचली होती.
एखाद्या कथानायकाने किंवा कादंबरीने गारुढ करणे म्हणजे काय असते हे पहिल्यांदा अनुभवलं.
महारथी कर्ण हा त्या काळात माझ्यासाठी हिरो झाला होता खरंतर त्या वयातील आकलनशक्ती पाहता मृत्युंजय मधल्या वेगवेगळ्या नावांची सूचीच जास्त आवडली होती. बस्तीक, नाराच, सर्पमूख यासारखी बाणांची नावे किंवा सावंतांनी वापरलेली भाषा शैली मनाला खूप भावली होती.
एखाद्या लेखकाला शस्त्र,राजे,वृक्ष यांची इतकी नावे कशी काय पाठ असु शकतात याचं कुतूहल वाटायचे.
जस जसं वय वाढलं तस-तसा कर्ण आणखी जवळचा वाटू लागला. मरतेसमयी सोन्याचे दात देखील दान करणारा कर्ण, मैत्रीसाठी जीवन त्यागणारा कर्ण, एकटाच दिग्विजयाला निघणारा, कुमारी भूमीवर अंतिम संस्काराची कामना करणारा कर्ण, खूप आवडला होता.
जेव्हा तारुण्यात पदार्पण केलं त्यावेळेस आजूबाजूच्या घटनांमुळे कर्ण अधिक व्यापक वाटू लागला. परशुरामाने त्याला ब्रह्मास्त्र शिकवायला नकार दिला, द्रोणाचार्यांनी त्याला शस्त्रविद्या दिली नाही कारण का? तर तो ब्राह्मण नव्हता, क्षत्रिय नव्हता !
कर्णाची गुणवत्ता नाकारली जाणे ही आजकालच्या युवकांची व्यथा वाटत होती. कर्ण म्हणजे रिझर्वेशनचा बळी असा समज झाला होता.
त्याने द्रौपदीला उच्चारलेले अपशब्द सुद्धा कॉलेज जीवनात असताना आक्षेपार्ह वाटले नाही.
"तारुण्य म्हणजे ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन" सारख्या पल्लेदार वाक्यामुळे कर्णा भोवती सहानुभूतीच आणि कौतुकाच वलय निर्माण झालं होत
पण जसजशा इतर कादंबऱ्या वाचल्या तसतसा कर्णाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. पर्व, युगांत,स्वयंभू अशा विविध कोनातून लिहिलेल्या साहित्यकृती वाचत गेलो. आणि हे महाकाव्य नव्या स्वरूपात उलगडत गेल.
मृत्युंजय वाचताना खरतर अस वाटायचं की पांडवच खलनायक आहे. कृष्णाचे कारनामेसुद्धा शब्दाप्रमाणे कृष्णकृत्य वाटायचे.
पण अखेर उपरती झाली !
पांडवांना राज्याचे वारस असून अरण्यात जन्म घ्यावा लागला, त्यांचं वय वाढलं तसं त्यांना मारण्याचे प्रयत्न होऊ लागले. कधी विषाद्वारे तर कधी लाक्षागृह जाळण्याचे प्रयत्न झाले पण म्हणून पांडवांनी त्याचा कधीही आजच्या भाषेत सांगायचे तर इश्यू केला नाही. त्यांनी स्वतःच्या कष्टातून उभारलेलं इंद्रप्रस्थसुद्धा त्यांच्याकडून हिरावल गेल.
यासर्वात सगळ्यात जास्त भरडला गेला तर तो होता अर्जुन! त्यांनी स्वयंवरात वरलेली द्रौपदी पाची भावांमध्ये पत्नी म्हणून राहिली. त्याने प्रांजळपणे उर्वशीला माता म्हटले त्याची शिक्षा म्हणून त्याला एक वर्ष बृहन्नडा बनावे लागले. एका पुरुषोत्तमाला नपुंसक बनून राहावे लागले याहून दुर्दैव ते काय.
अर्जुनाला त्यानुसार दोन वेळा वनवास भोगावा लागला, इतकेच काय पण गंधर्वयुद्ध, विराटयुद्ध , किरातयुद्ध अशा प्रत्येक युद्धात त्याने स्वतःला सिद्ध केल.
अगदी महाभारत युद्धातसुद्धा नात्यागोत्यांचा सारासार विचार करून त्यांनी संन्यास घेण्याचा संवेदनशीलपणा दाखवला होता. जेव्हा कृष्णाची अवतार समाप्ती झाली तेव्हा आपल्या मैत्रीच्या धर्माला तो जागला आणि यादव स्त्रियांच्या रक्षणासाठी धावून गेला.
हे सर्व वाचल्यावर महाभारताचा खरा नायक अर्जुन हाच होता हे पटू लागत. आज फेसबुक आणि व्हॉट्सऍप वर जेव्हा एखादा राजकीय नेता किंवा महापुरुष यांचे अतिरंजित मेसेजेस वाचतो तेव्हा व्यासांच्या प्रतिभेला सलाम ठोकावासा वाटतो. कर्ण - अर्जुन रूपाने त्यांनी जे चरित्र आपल्यासमोर उभं केले ते कालातीत आहे.
एक समूह म्हणून जगताना आपण कसे चुकीचे आदर्श निवडतो व त्यांना दैवत कसे बनवतो याचे उदाहरण म्हणजे महाभारतातील कर्ण हे पात्र !
कदाचित एवढं सगळं लिहून सुद्धा लोकांना काहीच कळलं नाही या नैराश्याच्या भावनेतून शेवटी वेद व्यास स्वतः म्हणतात की,
"ऊर्ध्वबाहू विरोन्मैष्य न कश्चित श्रुणोती माम"
अर्थ ...
"मी हात उंचावून सर्वांना सत्य सांगतो आहे पण माझं कोणीच ऐकत नाही"
महाभारताची हीच खरी शोकांतिका आहे!! आणि आजच्या युवकांची देखिल.!
©सौरभ रत्नपारखी
Comments