नाझिया हसन - एक शोकांतिका

अवघे ३५ वर्षांचे आयुष्य ! पण एवढ्या छोट्या काळातही ती संगीतविश्वावर विजेसारखी तळपली आणि अंतर्धान पावली. कलेला धर्म, प्रांत, जातीची बंधने नसतात हे वाक्य तस घासून गुळगुळीत झालेलं. पण हे ज्यांनी सार्थ करून दाखवल त्यातली एक गायिका म्हणजे 'नाझिया हसन' ! अगदी कमी वयात तिने पाकिस्तानच्या संगीतक्षेत्रात पदार्पण केले आणि पॉप संगीताची मुहूर्तमेढ रोवुन केवळ पाकिस्तानीच नव्हे तर आशियाई संगीतालाच कलाटणी द्यायला भाग पाडले. बेगम अख्तर, गुलाम अली, मेहंदी हसन या जातकुळीतल्या पाकिस्तानी संगीतासाठी ती एक सांस्कृतिक धक्का होती. ३०-४० वर्षांपूर्वीची पाकिस्तानी जनतेची मानसिकता लक्षात घेता तिच्या प्रागतिक संगीत प्रयोगाची कल्पना येईल. कारण तोवर पुढारलेला म्हणवल्या जाणाऱ्या भारतातही पॉप संगीताची पाळमूळ रुजलेली नव्हती. आपला भाऊ झोएब सोबत तिने एकापेक्षा एक सरस पॉप अल्बम दिले. दिलं बोले बुम बुम, डिस्को दिवाने, 'तेरी मेरी दोस्ती ही गाणी आजही नव्या पिढीला तोंडपाठ आहे. तिच्या अल्बमने विक्रीचा उच्चांक गाठला. मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. नाझिया उच्चविद्याविभूषित देखील होती. लंडनच्या प्रख्यात विद्यापीठातून तिने अर्थशास्त्र, कायदा आणि व्यवस्थापनाची पदवी घेतली होती. देखणे व्यक्तिमत्व व अल्पावधीतच मिळालेली लोकप्रियता असूनही यशाची हवा कधी तिच्या डोक्यात गेली नाही. अभिनयाच्या ऑफर्स येत असूनही तिने 'तो माझा प्रांत नाही' म्हणत स्वतःला दीर्घकाळ त्यापासून लांब ठेवले. बॉलीवुडला सुद्धा तिच्या गायकीची भुरळ पडली नसती तर नवल होत. फिरोज खानने कुर्बानी या सिनेमातून तिला पदार्पणाची संधी दिली. 'आप जैसा कोई मेरी जिंदगी मे आए' या गाण्याने ती भारतीय रसिकांमध्येही लोकप्रिय झाली. 'शिशा हो या दिलं हो' सारखी गाणी लोकप्रिय असतानाही उत्कृष्ट गायिकेचा फिल्मफेअर नाझीयाला मिळाला. एवढया कमी वयात फिल्मफेअर मिळवणारी ती पहिली महिला ठरली. केवळ गायिका म्हणूनच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातही एक माणुस म्हणून तिने स्वतःची वेगळी छाप सोडली होती. भारत आणि पाकिस्तानातल्या गरीब मुलांच्या शिक्षण व पुनर्वसनासाठी ती सढळ हाताने मदत करायची. अंमली पदार्थांच्या विरुद्ध मोहिमेतही तिने स्वतःचे मोलाचे योगदान दिले. युनिसेफची सांस्कृतिकदूत म्हणूनही तिने समाजकार्य केले. इंडिपॉप युगात लोकप्रिय झालेला अलिशा चिनॉयचा 'मेड इन इंडिया' हा अल्बम तीच गाणार होती पण त्याचे राजकीय पडसाद उमटतील म्हणुन तिच्याऐवजी अलिशाला संधी मिळाली. 90 च्या दशकात लकी अली, अलिशा चिनॉय, शान, इत्यादी गायकांचे जे व्हिडीओ अल्बम गाजले त्याची पायाभरणी खरतर नाझियानेच केली होती. तिचे वैयक्तिक आयुष्य मात्र खूप दुर्दैवी ठरले. वयाच्या तिशीतच तिला फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचे निदर्शनास आले होते. पाकिस्तानी व्यावसायिक मिरझा इश्तियाक बेगशी ती विवाहबद्ध झाली. पण त्याने हा विवाह प्रेमापोटी नसुन तिच्या पैशांसाठी केला आहे हे लवकरच तिच्या लक्षात आले. दोघांना नंतर एक मुलगाही झाला पण कौटुंबिक समाधान मात्र तिला मिळाले नाही. मुळातच मितभाषी आणि ऋजु स्वभावाची असल्याने तिने ही गोष्ट स्वतःच्या कुटूंबाला कळू दिली नाही. आपलं मरण दृष्टिक्षेपात येताच तिने मृत्यूच्या अवघ्या १० दिवस आधी घटस्फोट घेतला कारण आपल्या मुलाचा ताबा आपल्या लोभी पतीला मिळून त्याची हेळसांड होऊ नये. अखेर १३ ऑगस्ट २००० ला वयाच्या ३५ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. आज ती या जगात नसली तरी तिचा गोड आवाज, निस्वार्थ समाजसेवा, आणि पॉप संगीताला दिलेल्या योगदानाबद्दल संगीत रसिकांच्या मनात चिरकाल अमर राहील. #CinemaGully

Comments

Popular posts from this blog

मंगरुळ तें वॉशिंग्टन

तुघलक

ताजमहल