महानगर
“सर ! केदारनगरला कस जायचं?”
शहरातल्या ऐन वर्दळीच्या ठिकाणी एकाने अचानक हातातले एड्रेस कार्ड दाखवत मला प्रश्न विचारला.
स्वतःला अस्सल नाशिककर म्हणवणारा मी त्या प्रश्नावर मात्र गोंधळलो. कारण उण्यापुऱ्या ३३-३४ वर्षांच्या आयुष्यात अशी वसाहत नाशिकमध्ये आहे हेच माहीत नव्हतं.
पुर्वी नाशिकमध्ये पत्ता सांगणं एकदम सोपं काम होत. सैलानी बाबा स्टॉप म्हटलं की जेलरोड, बापु बंगला स्टॉप म्हटलं की इंदिरानगर, डोंगरे वसतिगृह म्हटलं की गंगापुर रोड, आणि त्रिमूर्ती चौक म्हटलं की सिडको ! एवढ्याच भांडवलावर पत्ता सांगितला जाई. गावठाण असेल तर घर नंबरही पुरेसा होता.
“स्टॉपवर उतरा, मी घ्यायला येतो” या शब्दात पाहुण्याला थेट घरापर्यंत घेऊन जाण्याइतका पाहुणचार इथे होतो त्यामुळे पाहुण्याला केवळ स्टॉपवर उतरण्याचे कष्ट घ्यावे लागे.
पण गेल्या काही वर्षात शहर वाढत चालल आहे. डिजीपीनगर दोघांपैकी कोणतं? शिवाजीनगर दोघापैकी कोणतं? हे ध्यानी ठेवावं लागतं.
मविप्र संस्थेच्या कॅम्पसला ‘शिवाजीनगर’ म्हणतात हे नविन बारसं फार उशिरा कळाल. बापु ब्रिजला बापु ब्रिज म्हणायच नाही ही तंबी ऐकावी लागते.
सीसीएमचा लॉंगफॉर्म काय? हे विचारल्यावर मित्राने टाकलेला जळजळीत तुच्छतादर्शक कटाक्ष पण विसरु शकत नाही.
साळीवाडा, तेलीगल्ली, तांबटलेन, कुंभारवाडा, पाथरवट लेन ही जातीवाचक नावे आता केवळ नावापुरता मर्यादित राहत आहे. वाड्यांच्या जागी त्याच नावाच्या मँशन, अपार्टमेंट, सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत. कालिका मातेच्या दर्शनासाठी जाणे म्हणजे शहराच्या बाहेर शिलंगणाचे सोने लुटले जाणे किंवा कॉलेजरोडला जंगल होत म्हणून सात वाजल्या नंतर सर्वजण गृपमध्ये एकत्र घरी परतायचे हा काळ संपून कित्येक वर्षे लोटली.
फेसबुकवर कोणीतरी पुण्या-मुंबईतील विनोदाच्या धर्तीवर शहराच्या विनोदाचे मिम्स बनवणारे पेज सुरू केले आहे. त्यात मुख्यत्वे विनोद काय असतात तर, सेंट झेव्हीयर, डॉन बॉस्को, फ्रावशी एकेडमी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची रायव्हलरी !! मग ह्या सगळ्यात पेठे, सारडा, रुंगठा, बिटको, मराठा, आदर्श, सिडिओ मेरी, रचना, कुठे गेले????
मध्ये एकदा कोणत्यातरी स्पर्धापरीक्षेच्या वेळेस बाहेरगावचे बरेच विद्यार्थी नाशिक केंद्र दिलेले असून सिन्नरला गेले होते, कारण का तर BYK (सिन्नर) वाचुन त्यांची फसगत झाली.
नागरीकरणामुळे शहराचा तोंडावळाच बदलत चालला आहे. फक्त नाशिकच नाही, तर आता चाकणमध्ये गाडी पोहोचली तरी पुण्यात आलो म्हणावं लागत. मुंबई-नाशिक अंतर आता लोकल सुरू झाल्याच्या परिमाणात मोजल जात.
शहराच्या भरवस्तीत बिबट्या घुसणे हे नित्याचे झाले आहे कारण आपण त्याच्या वस्तीत कधी घुसलो हेच कळले नाही.
(टीप : ही पोस्ट लिहीत असताना परत बिबट्या दिसल्याची बातमी वाचली.)
©सौरभ रत्नपारखी
Comments