People you may know
१९४७ साली गोऱ्या साहेबाने देश सोडला त्यानंतर गोऱ्या साहेबाशी बोलण्याची संधी कधी मिळाली नाही.
मधल्या काळात त्या मनोजकुमार वैगैरे मंडळींनी ‘गोरा साहेब कसा वाईट आणि आपण कसे चांगले’ हे पटवून दिल्याने साहेबाबरोबरचे बिघडलेले संबंध तसेच राहिले.
नाही म्हणायला गोऱ्या साहेबाने जाता जाता ‘क्रिकेट, चहा, थँक्यू, सॉरी,हॅपी बडडेच्या वाढदिवसाचे गाणे…’ असा बराच ऐवज मागे ठेवला होता.
अधून मधून आठवण आली की साहेब क्रिकेटचं निमित्त काढून परत भेटायला यायचा ! पण त्या शिवाजी पार्कच्या लहानसहान पोरांनीपण साहेबाचे रेकॉर्ड मोडून काढल्याने साहेब अजून वर्ल्डकपसाठी झुरतोय.
पुढे पुढे तर असं झालं की फ्लिंट्फने शर्ट काढला कि सौरवदादा पण शर्ट काढून खुन्नस द्यायचा !
एंड्यु कॅंडिकने आव्हान दिले की सचिन त्याला कानशिलात मारल्यासारखा सिक्सर मारायचा ह्या प्रकारामुळे साहेबाची भीती कोणाला राहिली नाही.
साहेब पाहण्याचा योग फक्त ज्यूरासीक पार्क, जु्मांजी, गॉडझिला पाहण्याच्या निमित्ताने येई त्यातही अक्राळविक्राळ प्राण्यांचे कौतुक जास्त असल्याने इतर बाबीकडे कधी लक्ष गेले नाही.
शेतकऱ्यांचा लगान माफ करण्यासाठी क्रिकेटची मॅच आयोजित करायचे असते हे पवार साहेबांच्या आधी कॅप्टन रसेलसाहेबाला माहीत होत ह्याच मात्र नवल वाटायचं !
‘चक दे इंडिया’ मध्ये शाहरुख जेव्हा म्हणतो की ‘पहली बार किसी गोरेको इंडियाका तिरंगा लहरात हुए देख रहा हु!!’ हे ऐकल्यावर साऱ्या पिटातल्या प्रेक्षकांनी शिट्या वाजविल्या होत्या, कारण साहेबावरचा राग अजूनहि गेलेला नाहि.
एकदा विजयानंद सिनेमागृहात ‘राजाबाबू’ सिनेमा पहायला गेलो होतो, तेव्हा शेजारच्या सिटवरचे अभ्यासू गृहस्थ म्हणाले होते की इथेच अनंत कान्हेरेने जॅक्सन ह्या इंग्रज अधिकाऱ्याला गोळ्या घातल्या होत्या. हे ऐकल्यावर सिनेमा संपेस्तोवर पडद्यावरचे करिश्मा-गोविंदा बाजूला राहिले आणि हाच विषय डोक्यात घोळत राहिला.
घराजवळच्या गल्लीबोळातच सावरकरांचे
क्रांतिकारी मित्र राहिलेले होते त्यामुळे आपल्याला तो काळ अनुभवता आलं नाही ह्याची रुखरुख आहेच.
देवकृपेने जन्म-शिक्षण-व्यवसाय नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत झाल्याने सातासमुद्रापार जाण्याचा योग अद्याप आला नाही.
लहानपणी देवगिरीचा किल्ला चढताना एका जपानी महिलेने ‘Do you speak English?’ असा कौतुकाने प्रश्न विचारला होता. एखादी जपानी बाई इंग्लिशपण बोलू शकते हा धक्का माझ्या बालमनासाठी त्याकाळी सर्जिकल स्ट्राईकसारखा अनपेक्षित होता म्हणून गोंधळून ‘No’ असं बाणेदारपणे म्हणालो. (आणि इंग्रजी प्रश्न समझला तरी No का म्हणाला म्हणून कदाचित ती पण गोंधळून गेली असावी)
नाही म्हणायला गोऱ्या साहेबाची आणि माझी एकदाच गाठ पडली ती देखील गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर !! शेजारच्या बाकड्यावर उन्ह खात पडलेल्या एका गलेलठ्ठ साहेबाने माझ्याकडे बघत मनगटाकडे बोट दाखवीत टाइम विचारला होता ! (माझ्या चेहऱ्यावरचे निर्विकार भाव पाहता इंग्रजी समझत नसावे असा त्या साहेबांचापण समझ झाला असावा), तरीपण मी उसने अवसान आणत ‘ट्वेल्व्ह ओ क्लॉक’ असं अस्सल मराठी उच्चारातलं इंग्रजी उत्तर दिले.
तरीपण साहेबाला खात्री न पटल्याने स्वतः उठून घड्याळ पाहण्यास आला.
साहेबाने घड्याळ पाहण्यासाठी का होईना हस्तांदोलन करण्याची ही पहिली आणि अखेरची वेळ !
आज हे सर्व सांगायचं कारण म्हणजे मार्क झुकरबर्ग भाऊंनी ‘पीपल यु मे कनो’ मध्ये दोन चार फिरंगी चेहरे दाखविले. अन उगाचच आपण पण ग्लोबल असल्याचे वाटल्याने ‘फिलिंग प्राउड’ वैगेरे झालं.
@सौरभ रत्नपारखी
Comments