इतिहास सिनेमॅटिक लिबर्टीचा (संतपट)
भाग 2 .. संतपट
पौराणिक सिनेमाचं युग संपून संतपटांचा ट्रेंड आला, तेव्हा खऱ्या अर्थाने 'कला आणि इतिहासाचा' संघर्ष सुरू झाला. कारण पौराणिक मालिकांमध्ये चमत्कार दाखविण्याचे स्वातंत्र्य होते, परंतु संत ज्ञानेश्वर, संत गोरा कुंभार, संत तुकाराम, अशा अनेक संतांच्या जीवनपटात काल्पनिक प्रसंगांचा समावेश करण्यात आल्याने ते वास्तवापासून दुर गेले.
उदा. प्रभातचा सार्वकालिक महान सिनेमा 'संत तुकाराम' ! भारताबाहेर (overseas) ख्याती मिळविलेला हा पहिला सिनेमा ! व्हेनिस चित्रपट महोत्सवात पाश्चात्य समीक्षकांनी तर येशू ख्रिस्ताच चरित्र पाहिल्याचा भास झाला अशी प्रशंसा केली.
ह्या सिनेमाने अफाट लोकप्रियता मिळवली.
तुकारामांची भूमिका करणाऱ्या विष्णुपंत पागनिसांना अशी लोकप्रियता मिळाली की गावोगावी आजही त्यांचे छायाचित्र तुकाराम महाराज म्हणून पुजले जाते. प्रेक्षक चक्क चित्रपटगृहाबाहेर चप्पल काढून आत जात असत. लोक पागनिसांच्या पाय पडत असत. पागनिसांनी सुद्धा हि लोकांच्या मनातील प्रतिमा जपन्यास्तव पुढे अधिक सिनेमात काम केले नाही.
ह्या सिनेमात विठोबाच्या कृपेने आकाशातून धान्यवृष्टी होते, मुघल सेनेला कीर्तनाला बसलेले शेकडो शिवराय दिसतात, तुकाराम सदेह वैकुंठाला जातात असे स्पेशल इफेक्ट वापरलेले अनेक प्रसंग होते.
संत ज्ञानेश्वर व इतर सिनेमातही असे अनेक प्रसंग होते. परंतु ऐतिहासिक संदर्भात अशा घटनांचे पुरावे उपलब्ध नव्हते तर केवळ प्रतिकात्मक किंवा रूपक कथा म्हणून ते योग्य ठरत होते.
स्वा.सावरकरांसारख्या विज्ञानवादी इतिहासकाराने सुद्धा ह्यावर टीका करत 'बोलपट कसे पहावे' ह्या निबंधात त्याचे सूंदर विवेचन केले आहे.
पण केवळ पैसे कमविणे हे तत्कालीन चित्रपट निर्मात्यांचे ध्येय नव्हते तर ब्रिटिश सरकार विरुद्ध जनमत तयार व्हावे ह्यास्तव उघडपणे शक्य नसल्याने असे चित्रपट सुप्तपणे वातावरण निर्मिती करत. बालगंधर्वांच्या किचकवध सारख्या नाटकात 'किचक म्हणजे इंग्रज सरकार' आणि 'सैरंध्री' म्हणजे 'शोषित भारतीय जनता' असा संदेश दिला जाई.
शिवरायांच्या चित्रपटातून स्वराज्यप्रेमाचं संदेश दिला जाई तर 'शेजारी' सारखा सिनेमा हिंदू-मुस्लिम ऐक्याची गरज वेगळ्या शब्दात सांगत असे.
संत दामाजीपंत ह्यांच्या जीवनावर आधारीत 'झाला महार पंढरीनाथ' ह्या चित्रपटात शेवटचे गीत पण ह्याचे सूंदर उदाहरण आहे. विठू महार नामक कोण्या व्यक्तीने दंडाची रक्कम भरून दामाजीपंताची सुटका केली होती असे इतिहास सांगतो म्हणून ह्या कथेचा चपलखं उपयोग चित्रपटात करून घेण्यात आला.
बादशाह स्वतः मंदिरात येऊन कोण विठू होता हे पाहण्यासाठी येतो तेव्हा दामाजीपंत आर्त स्वरात गाण म्हणतात 'निजरुप दाखवा हो, हरी दर्शनास या हो " आणि बादशाहला सुद्धा त्यांचे दर्शन होताच "श्रीकृष्ण विष्णू राम, तोचि विठू महार" हि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आळवणी नकळतपणे अस्पृश्यता निवारणाचे काम करून जाते.
अशा कथांमधील सत्य शोधणे महत्वाचे असो अथवा नसो पण समाज घडविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे हे मान्य करावे लागेल.
तुकोबा स्वर्गात जात असतानाच्या सीनमधला आवलीने केलेला आक्रोश ऐकला कि क्षणभर आपल्यातला इतिहास अभ्यासक गळून पडतो आणि आपण पण डोळे मिटून 'विठ्ठल विठ्ठल' करू लागतो.
कला कधी कधी इतिहासाला मात देते ती अशी !!
(क्रमश) सौरभ रत्नपारखी
Comments