रामशेज
पेठला बदली झाली तेव्हापासून 'नाशिक-पेठ' मार्गावरचा छोटासा रामशेज किल्ला नित्य परिचयाचा झाला. भरधाव धावणाऱ्या बसच्या खिडकीमधून रामशेज दिसला की मंदिर दिसल्याप्रमाणे हात जोडण्याची इच्छा होते.
कदाचित नाशिकच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला कल्पना नसेल की शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या किंल्ल्याने इतिहासात काय चमत्कार घडवला होता.
छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला हायसे वाटले होते, की आता दक्खन आपल्या मुठीत घेण्याची हीच वेळ आहे. शिवराय हयात असेपर्यत ह्या मुलुखात येण्याची त्याची हिंमत होत नव्हती.
त्यामुळे शिवरायांच्या मृत्यूनंतर खचलेला महाराष्ट्र सहज चिरडून टाकू हा त्याचा कयास होता. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होत.
अफाट फौजफाटा घेऊन अनुभवी आलमगीर दख्खनेत उतरला होता. मराठेशाही, कुतुबशाही, आदिलशाही तिन्ही शाह्या संपविण्याची जय्यत तयारी सुरू झाली होती.
दुसरीकडे उभा होता एक तरणाबांड छत्रपती !!! आपल्या पराक्रमी पित्याने मागे सोडलेला गौरवशाली वारसा टिकवून ठेवण्यासाठी वज्रनिर्धार केलेले शंभूराजे !!
मूठभर माणसं, थोडेफार किल्ले, कोकणपट्टीेतले नवोदित आरमार या सर्वांच्या जीवावर हा रणचंडीचा होम पेटला.
‘शिवाजी मेला’ ही बातमी ऐकून इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी सर्वांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या. जल्लोष होत होता.
अशातच औरंगजेबाने ठरविले की मोहिमेची सुरुवात करायची ती नाशिकच्या उंबरठ्यावर असलेल्या रामशेज ह्या पिटुकल्या किल्ल्याने !! हा किल्ला कोणे एकेकाळी शाहजहानला शुभशकुन ठरला होता म्हणून औरंगजेब इथूनच शुभारंभ करणार होता.
हा किल्ला रायगड, प्रतापगड प्रमाणे दुर्गम नव्हता. देवगिरीप्रमाणे भव्य म्हणावा असाही नाही. प्रभू श्रीराम वनवासात असताना इथे शेज करून झोपले म्हणून रामशेज नाव पडले होते.
आता सीतेसारख्या स्वराज्याचे हरण करायला रावण पुन्हा पंचवटीच्या दिशेने निघाला होता. आणि रामशेजवर एक कसलेला किल्लेदार जटायूप्रमाणे त्याची वाट अडवायला उभा ठाकला होता.
ह्या किल्लेदाराच नाव इतिहासाला माहीत नाही. पण त्याने स्वराज्याच्या इतिहासात एक सुवर्णपान लिहिले.
त्यावेळी किल्ल्यावर काहीच नव्हतं. मूठभर मावळे अन तोफांचा पता नाही.
होता फक्त शिवरायांनी रुजवलेला बाणा “ एक किल्ला एक वर्ष जरी लढला तरी औरंगजेबास स्वराज्य जिंकायला 300 वर्ष लागतील”!!
रामशेजने लढायला सुरुवात केली. किल्ल्याच्या तटावर असणाऱ्या झाडांच्या फांद्यांमध्ये चामड्याच्या गलोल तयार करून दगड फेकण्यास सुरुवात केली.
हा दगडांचा मारा इतका तिखट होता की सकाळी अजान सुरू झाल्यावर तोफा चालवायच्या व दुपारी किल्ल्यावर जेवण करायचा मुघल सेनेचा मनसुबा पहिल्याच दिवशी उधळला गेला.
नंतर जे घडत गेलं ते सर्व विस्मयकारक होत. एक वर्ष नव्हे तर तब्बल पाच वर्षे रामशेज लढला. शहाबुद्दीन, बहादूरखान, किरमानी, असे एकेक शिलेदार औरंगजेब पाठवत होता पण रामशेज झुकत नव्हता.
रामशेजवर पडणारा एकेक तोफगोळा मुघल साम्राज्याची मृत्युघंटा वाजवत होता.
एवढासा किल्ला असा झुंजणार असेल तर पुढे काय वाढून ठेवलंय ह्याची बादशाहला कल्पना येऊ लागली. रागाच्या भरात त्याने संभाजीला हरविल्याशिवाय किमॉश घालणार नाही म्हणून डोक्यावरून पगडी खाली काढली. पुढची बरीच वर्षे त्याला तसेच उघड्या डोक्याने फिरावे लागले.
इकडे रामशेज जिंकण्यासाठी लाकडी धमधमे तयार करण्यापासून मंतरलेल्या सापापर्यत सर्व उपाय वापरले गेले. अखेर ५ वर्षांहून अधिक काळ झुंजल्यावर किल्लेदाराला किल्ला सोडावा लागला.
पण तोवर रामशेजने आपले काम चोख बजावले होते. मुघल फौजांवर मानसिक आघात झाला होता. मराठे आता पळणार नाही ही जाणीव त्यांना झाली होती.
ज्या नाशिकला फुलबागांवरून गुलशनाबाद म्हटले जाई तिथली फुले पण अंगारे बनल्याचे कल्पना मुघलांना आली. शेकडो वर्षांपूर्वी अल्लाउद्दीन खिलजीच्या (मलिक कफूरच्या) फौजेने महाराष्ट्राचा युवराज शंकरदेवाला रणभूमीत ठार मारले होते, मुबारक खिलजीने यादवांचा जावई हरपालदेवाची चामडी सोलून त्याला देवगिरीच्या दरवाज्यावर टांगले होते, त्यानंतर सारा महाराष्ट्र गुलामगिरीच्या अंधकारात गर्भगळीत होऊन पडला होता, पण आता इतिहास बदलणार होता. युवराजाची हत्या पुन्हा घडणार होती पण ह्यावेळेस सारा मावळमुलूख पेटून उठणार होता. जिंजीपासून जंजिऱ्यापर्यंत एक शिवचैतन्याचा वणवा पेटला होता.
रामशेजने ती ठिणगी पाडली होती.
आगाज झाला होता, अंजाम खुलताबादला दिसणार होता.
‘सीवा तो नही रहा पर अपने पिछे सेकडो सीवा पैदा करके गया था’!!!
©सौरभ रत्नपारखी
Comments