गाथा ३ सफरचंदांची
असं गंमतीने म्हणतात की या जगात 3 सफरचंदांनी इतिहास रचला !
पहिलं सफरचंद, बायबलमधल्या ऍडम आणि ईव्हच्या कथेतील आहे. ‘एडम आणि ईव्ह’ हे सृष्टीकर्त्याने निर्माण केलेले पहिले ‘स्त्री व पुरुष’! त्या कथेनुसार सर्परूपी सैतान हा एडम आणि ईव्हला स्वर्गलोकीच्या वृक्षावरील सफरचंद खाण्याची प्रेरणा देतो. ते सफरचंद खाल्यावर ईव्हला लज्जेची ज्ञानप्राप्ती होते. आपल्या विवस्त्रपणाची जाणीव होताच ती एडमच लक्ष जाऊ नये म्हणून झाडामागे लपते.
दुसरे सफरचंद, आयझेक न्यूटनने पाहिलेले.
ते सफरचंद पडताना पाहून न्यूटनला गुरूत्वाकर्षणाच्या सिद्धांताची कल्पना सुचली असे मानले जाते.
आणि तिसरे सफरचंद म्हणजे स्टिव्ह जॉब्सच्या ऍपल कंपनीच्या लोगोमधले !
ह्या कथांमागचा गंमतीचा किंवा दंतकथेचा भाग सोडला तर अप्रत्यक्षरित्या हे विज्ञानाच्या इतिहासाचे ३ टप्पे दाखवतात.
हे टप्पे विज्ञानक्षेत्रातले असल्याने त्याला इतिहासाप्रमाणे काळांचे वर्गीकरण लावणे चुकीचे ठरेल.
एडम आणि ईव्हच्या कथेला धार्मिक पार्श्वभूमी आहे. (इस्लाममध्ये हीच कथा आदम आणि हौव्वा ह्यांच्या नावाने सांगितली जाते. मनुष्यप्राण्याला ‘आदमजात’ त्यावरूनच म्हटले जाते.)
ही कथा सजीवांची उत्पत्ती व विचारसरणीच्या उदयांचे छोटे प्रतिक मानले पाहिजे. मानवाने अश्मयुगाकडून धातूयुगाकडे वाटचाल सुरू केली तेव्हा हे करीत असताना कालौघात त्याने टोळीसंस्कृती सोडून कृषीसंस्कृती स्वीकारली.
अन्न, वस्त्र, निवारा या मूलभुत गरजांच्या बाबतीत विचार करीत असतानाच त्याने दगडापासून शस्त्र बनवायला सुरुवात केली.
Food Technology, Textile engineering, Civil engineering यांच्या पायाभरणीचा हा काळ होता.
दोन दगड एकमेकांवर आपटून ठिणग्या पाडून आग निर्माण करायला तो शिकला हा त्याला ज्ञात झालेला कदाचित पहिला शोध !! आधुनिक थर्मोडायनॅमिक्सची सुरुवात झाली ती अशी.
आगीवर नियंत्रण करता येऊ लागल्यापासून स्वसंरक्षण व रुचकर अन्न बनवणे तो शिकला.
चाकाचा शोध लागल्यावर त्याच्या दळणवळण करण्याच्या क्षमतेवर मोठा परिणाम घडून आला.
हे करीत असताना चाकावर त्याने मडके बनविण्याची कला अवगत केली. कुंभाराचे चाक हे आधुनिक लेथ मशिनचे जनक म्हणणे योग्य ठरेल. फिरत्या चाकावर स्थिर वस्तूला आकार देण्याच्या संकल्पनेतून ग्राइंडर, ड्रिलर, शेपर वैगेरे सर्व संकल्पना जन्माला आल्या.
मानवाला लागलेल्या चाकाच्या आणि आगीच्या शोधाने त्याला इतर प्राण्यांपेक्षा पृथ्वीवर विशेष दर्जा मिळवून दिला.
पण हे सगळं करित असताना तो कुठेतरी अस्वस्थ होता.
वीज, भूकंप, पाऊस, वादळ, जीवन, मृत्यू हे सर्व कसे काय होत ह्याचे आकलन त्याला होत नव्हते. अवकाशात अचानक उगवणारे धूमकेतू, ग्रहण, उल्कापात हे प्रकार त्याला भयचकित करत होते. आपल्या आवाक्यापलीकडच्या या गोष्टींना नियंत्रित करणारा कोणीतरी आहे या भावनेतून त्याने देव, स्वर्ग, नरक, मोक्ष, या संकल्पना जन्माला आल्या. त्यातल्या प्रत्येकाच्या मतभेदातून धर्म, पंथ,जात, उदयास आले. निसर्गाने दिलेल्या शारीरिक व भौगोलिक विषमतेतून त्याने वंश, प्रांत निर्माण केले. नद्यांच्या काठी अनेक शहरे, साम्राज्ये, संस्कृतीच्या रूपाने उदयास आल्या. नाईल, अमेझॉन, सिंधू अशा अनेक संस्कृतीने व संघर्षाने मानवाला एका नव्या वळणावर आणले.
मध्ययुगाच्या प्रारंभी धर्मसत्ता व राजसत्ता ह्यांचा पगडा जगभर बसला होता. पण पुढे गॅलिलिओ, कोपर्निकस सारख्या शास्त्रज्ञांनी बंडाचा पवित्रा घेतला, धर्मग्रंथातल्या संकल्पना झुगारून लावल्या. त्याचे विपरीत परिणाम देखील सोसले. डार्विनच्या सिद्धांताने तर सर्व धर्मग्रंथांच्या पायालाच सुरुंग लावला. एडम, ईव्ह पासून मनु पर्यत सर्व पुराणकथा एका झटक्यात निरर्थक केल्या. न्यूटनने सिद्धांतांना गणिताची प्रबळ जोड देऊन आधुनिक विज्ञानाची पायाभरणी केली. इंजिनच्या आणि हातमागाच्या शोधाने औद्योगिक क्रांती घडविली.
कोलंबस, वास्को-दि-गामा, अमेरिगो व्हेस्पुसी सारख्या खलाशांच्या प्रवासी जहाजांनी नवा इतिहास रचला. ईस्ट इंडिया कंपनी सारख्या कंपन्या तर सत्ताकारणात सहभाग घेऊ लागल्या.
विज्ञान राजसत्तांवर वर्चस्व गाजवू लागले.
अश्मयुगात दगडांच्या अवजारांनी इतिहास रचला होता त्याचप्रमाणे मध्ययुगात बाबरच्या तोफा, इंग्रजांच्या बंदुका इतिहासाला कलाटणी देऊ लागल्या.
(आयझेक न्यूटन हा छत्रपती शिवाजी, संभाजी, राजाराम व शाहू ह्यांचा समकालीन होता, यावरून विज्ञानाच्या प्रगतीचा अंदाज येईल.)
मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात छपाईचे तंत्र प्रगत झाले होते. या माध्यमक्रांतीमुळे विचारांची देवाणघेवाण सुलभ झाली. मानवप्राणी विचारशील झाला. ज्ञानसंग्रह करणे सुलभ झाले.
चित्रलिपीतून अक्षरलिपीत येऊन बराच काळ लोटला होता. तरी छपाईच्या शोधाने त्याला नवे आयाम दिले. छायाचित्रण व ग्रामोफोनमुळे एखादी व्यक्ती, घटना अथवा आवाज चिरकाल स्मृतीत ठेवण्याची सोय झाली. हे अभूतपूर्व होत.
गेल्या दोन-तीनशे वर्षात तर विज्ञानाने धुमाकूळ घातला आहे. वीजनिर्मिती,संगणक आणि दूरसंचार यांनी जी उलथापालथ केली ती अभूतपूर्व होती.
एकमेकांशी संघर्ष करण्याच्या वृत्तीतून जे अश्मयुगात व मध्ययुगात केले ते आधुनिक युगात अण्वस्त्रे निर्माण करून केले, चंद्रावर पाऊल ठेवत पृथ्वीचे क्षितिज पार केले. आईन्स्टाईन व हॉकिंग्ससारख्या शास्त्रज्ञांनी आणखी बरीच मजल मारायची आहे ही जाणीव करून दिली.
स्टिव्ह जॉब्सचे ऍपल हे त्या साऱ्यांचे मध्यवर्ती प्रतिक बनले!!
गत वीस वर्षांतच आपल्या डोळ्यादेखत पेजर, वॉकमॅन, वॉकिटॉकी, स्टॉपवॉच, कॅसेट वैगेरे संकल्पना पाहता पाहता नाहीशा झाल्या.
मोबाईल ऍपमुळे तर कॅलेंडर, कॅलक्युलेटर, डिक्शनरी, कॅमेरा या सारख्या अनेक वस्तू तळहातावरच्या एका मोबाईलमध्ये आल्या. हा वेग तर इतका भयानक आहे की बिल गेट्स सारखा संगणकसम्राटसुद्धा म्हणाला की मी इंटरनेटकडे दुर्लक्ष्य करून चूक केली. वैद्यकीय क्षेत्रात दररोज नवीन उपचार पद्धती निर्माण होऊ लागल्या आहेत. आता तर रोबोटला नागरिकत्व मिळाले आहे.
या सर्वात आपण कुठे आहोत?? आजही आपण अवतीभोवती अंधश्रद्धेतून जाणारे बळी पाहतो, व्हाट्सअपवरचे अवैज्ञानिक मेसेज शहानिशा न करता फॉरवर्ड करतो. विज्ञानाच्या Measurability, Universabiliy, Repeatability या तत्वांना न जुमानता ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ म्हणतो.
Interstellar, Inception सारखे दर्जेदार विज्ञानपट पाहण्यापेक्षा बॉलीवुडपटातल्या निर्बुद्ध फायटिंगवर टाळ्या वाजवतो.
हे सर्व बदलायचं असेल तर विज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे. इतिहास आणि विज्ञान हातात हात घालून चालतात हे समझणे गरजेचे झाले आहे. ही विज्ञानेतिहास मालिका त्या जाणिवेचा शुभारंभ ठरो.
©सौरभ रत्नपारखी
Comments